नवी दिल्ली, दि. 23 - उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला असून एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथील अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना औरैया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. तसेच, एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तर, दुसरीकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सुद्धा या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर घटनास्थळी वरिष्ठ रेल्वे अधिकारी दाखल झाले आहेत, असे ट्विट केले आहे.
याचबरोबर, गेल्या शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात 23 प्रवाशांचा मृत्यू झाला तर, 40 हून अधिक जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, याप्रकरणी वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, तर एका अधिका-याची बदली करण्यात आली आहे.