दिल्ली विधानसभेमध्ये मंगळवारी कॅगचा अहवाल सादर होणार आहे. यामध्ये ६ फ्लॅग स्टाफ रोडवरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणामधील गंभीर अनियमिततेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. हा तोच बंगला आहे जिथे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वास्तव्यास होते. या अहवालामध्ये ६ फ्लॅग रोडवरील बंगल्याचा विस्तार करण्यासाठी नियमांचं उल्लंघन करून कॅम्प ऑफिस आणि स्टाफ ब्लॉकचा समावेशही त्यात करण्यात आला होता.
रिपोर्टनुसार ६ फ्लॅग स्टाफ रोडवरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी पीडब्ल्यूडीने टाइप VII आणि VIII घरांसाठी सीपीडब्ल्यूडीकडून प्रकासित प्लिंथ एरियाचे दर विचारात घेऊन ७.९१ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक बनवलं होतं. दिल्लीतील पीडब्ल्यूडीने या कार्याला अत्यावश्यक घोषित केलं होतं. या बंगल्याच्या नुतनीकरणाचं काम कोरोनाच्या काळात पूर्ण झालं होतं.
मात्र जेव्हा या कामासाठी टेंडर निघालं तेव्हा खर्च वाढून तो ८.६२ कोटी रुपये एवढा झाला होता. हा खर्थ अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा १३.२१ टक्के अधिक होता. ६ फ्लॅग रोड स्थित मुख्यमंत्री निवासाचं काम पूर्ण झालं, तेव्हा यावर एकूण ३३.६६ कोटी रुपये एवढा खर्च झाला. खर्च अंदाजपत्रकापेक्षा तब्बल ३४२.३१ टक्क्यांनी अधिक होता.