राफेल खरेदी व्यवहाराची कॅगने चौकशी करावी; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:40 AM2018-09-20T00:40:21+5:302018-09-20T00:40:51+5:30
नेत्यांनी घेतली आॅडिटर जनरलची भेट
नवी दिल्ली : फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी बुधवारी कॉम्प्ट्रोलर अँड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया (कॅग) यांची भेट घेऊन केली.
या शिष्टमंडळात काँग्रेस नेते आनंद शर्मा, अशोक गहलोत, मोतीलाल व्होरा, जयराम रमेश, अहमद पटेल, राजीव शुक्ला, रणदीप सूरजेवाला, मुकुल वासनिक यांचा समावेश होता. आनंद शर्मा यांनी सांगितले की, राफेल खरेदी व्यवहारामध्ये कशा प्रकारे घोटाळा झाला आहे याची माहिती आम्ही निवेदनाद्वारे कॅगला सादर केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, खाजगी उद्योगपतीला फायदा व्हावा म्हणून राफेल व्यवहारातून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सार्वजनिक उपक्रमाला पद्धतशीरपणे बाहेर काढण्यात आले, याकडे कॅगचे आम्ही लक्ष वेधले आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी कॅगकडे केली आहे. त्यावर या व्यवहाराच्या सर्व पैलूंची याआधीच तपासणी सुरू केली आहे, असे कॅगने काँग्रेस नेत्यांना सांगितले.
त्यांच्या समाधानासाठी चौकशी करणार नाही - भाजप
राफेल व्यवहाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, अशी काँग्रेसने याआधी केलेली मागणी मोदी सरकारने अमान्य केली होती. त्यामुळे या प्रकरणी कॅगचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय मग काँग्रेसने घेतला.
या व्यवहाराबाबत काँग्रेस सातत्याने करत असलेले सर्व आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. ज्यांना या व्यवहाराची माहिती नाही, त्यांच्या समाधानासाठी आम्ही या व्यवहाराची चौकशी करू इच्छित नाही, असे भाजपने म्हटले आहे.