Justice Abhijit Gangopadhyay Join Politics? (Marathi News) कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्यासारख्या संवेदनशील प्रकरणाच्या सुनावणीत सहभागी होते.
रविवारी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी सांगितले की, मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपल्या राजीनामा पाठवणार आहेत. तसेच, राजीनाम्याची प्रत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवली जाईल.
दरम्यान, न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी राजकारणात एन्ट्री करण्यासंदर्भात संकेत दिले आहे. "जर मी एखाद्या राजकीय पक्षात सामील झालो आणि त्यांनी मला उमेदवारी दिली, तर मी त्या निर्णयावर नक्कीच विचार करेन", असे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय म्हणाले.
न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे ऑगस्ट 2024 मध्ये न्यायिक सेवेतून निवृत्त होणार होते. सध्या ते कामगार प्रकरणे आणि औद्योगिक संबंधांसंबंधीच्या खटल्यांवर सुनावणी करत आहेत. आपल्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय म्हणाले, "राज्य अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. येथे चोरी आणि लुटमारीचे साम्राज्य सुरू आहे. एक बंगाली असल्याने मी हे स्वीकारू शकत नाही. राज्यातील सध्याचे राज्यकर्ते लोकांसाठी कोणतेही चांगले काम करू शकतील, असे मला वाटत नाही."
याचबरोबर, सत्ताधारी व्यवस्थेने त्यांना दिलेल्या आव्हानामुळे हा निर्णय घेण्यासाठी प्रेरित केल्याचेही न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय म्हणाले. या आव्हानासाठी मी सत्ताधारी पक्षाचे आभार मानू इच्छितो, असे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी सांगितले.