कोलकाता: कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ममता यांनी निवडणुकीसंबंधी एक याचिका दाखल केली होती, त्या याचिकेच्या सुनावणीतून जस्टिस कौशिक चंदा यांना हटवण्याची मागणी केल्यामुळे ममतांवर ही कारवाई झाली आहे. ममतांनी जस्टिस चंदा यांच्यावर भाजपशी संबंध असल्याचा आरोपही लावला होता.
ममता म्हणाल्या होत्या की, 'जस्टिस चंदा यांचा एक फोटो समोर आला आहे, त्यात त्या भाजप नेत्यांसोबत दिसत आहेत. त्यांचे भाजपसोबत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांना या खटल्याच्या सुनावणीतून हटवण्यात यावे.' जस्टिस चंदा यांनी 24 जूनला निर्णय राखीव ठेवला होता. बुधवारी निर्णय देताना न्यायालयाने म्हटले की, ममतांनी न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जस्टिस चंदा यांनी स्वतः या सुनावणीतून बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे प्रकरण ?
2 मे रोजी देशातील 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडुकीचे निकाल लागले. बंगालमध्ये ममता यांचा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांच्याकडून अवघ्या 1956 मतांनी पराभव झाला. त्याच दिवशी ममतांनी पुन्ही मतमोजणीची मागणी केली होती, पण निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळून लावली. यानतंर या निर्णयाविरोधात ममतांनी कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात त्यांनी शुभेंदु अधिकारींवर निवडणुकीत लाचखोरी, भ्रष्टाचार आणि धर्माच्या आधारे मत मागल्याचा आरोप लावत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती.