ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ७ - आज जगभरात ईद-उल-फित्र साजरी केली जात असताना कोलकात्यातील प्रसिद्ध 'बंगाली बाबर मशीदीमध्ये' एका हिंदू ट्रस्टमुळे हा दिवस साजरा करण्यात येतो व त्यासाठी तेथील कर्मचारी नेहमची त्याचे ऋणी राहतील. कोलकात्यातील जोरासंको येथील मार्बल पॅलेसमधील दक्षिणेकडील कोप-यात बांधण्यात आलेली ही मशीद तब्बल १८१ वर्ष जुनी आहे. १८३५ साली मलिक यांच्यातर्फे ती बांधण्यात आली होती. एखाद्या हिंदू ट्रस्टतर्फे कारभार चालवली जाणारी देशातील ही एकमेव मशीद असेल.
कोलकात्यातील हा मार्बल पॅलेस व तेथील मशीदीचा कारभार एका धार्मिक हिंदू ट्रस्टतर्फे (भगवान जगन्नाथ) चालवण्यात येतो. मिळालेल्या माहितीनुसार, राजन मलिक यांची माता हिरामणी दशी यांना एक दिवस स्वप्नात श्री जगन्नाथ भगवान दिसले व ते त्यांना घरात घेण्यास सांगत होते. हिरामणी यांनी त्यांचा मुलगा राजन यांना श्री जगन्नाथ भगवान यांच्या सन्मानार्थ राजवाड्यात एक मंदिर बांधण्यास सांगून त्यासाठी एक ट्रस्ट उभारण्याची सूचना केली. आईच्या आदेशानुसार राजन यांनी हे मंदिर बांधले. मात्र त्यांच्या आईला स्वप्नात केवळ श्री जगन्नाथ दिसल्याने येथे फक्त त्यांचीच पूजा केली जाते, सुभद्रा व बलराम या त्यांच्या भावडांची नव्हे.
मात्र या भागात बहुसंख्य मुस्लिम नागरिकांती वस्ती असल्याने तेथे एका मशिदीची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊनच मलिका यांनी राजवाड्याच्या आसपासच्या परिसरातच एक मशीद बांधली व ट्रस्टतर्फे त्याचा कारभार चालवण्याची सोय केली. भगवान जगन्नाथाचे मंदिर व ही मशीद या भागातील दोन कोप-यांध्ये पण एकमेकांसमोरच बांधलेले दिसते. आपल्या मालमत्तेच्या संरक्षणासाठीच मलिक यांनी हा ट्रस्ट बांधून त्यातर्फेच मशिदीला निधी देण्याची व्यवस्था केली.
बुधवारी श्री जगन्नाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्या राजवाड्यातही हा सण पारंपारिक पद्धतीने, रिती-रिवाजांनुसार साजरा करण्यात आला. त्यासाठी ५६ त-हेच्या पक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला व ओरिसा येथून पुजा-यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. रथयात्रा व उलटा रथ दरम्यान देवांची मूर्ती संपूर्णपणे सोन्याने मढवण्यात आली होती.
त्यानंतर आज (गुरूवार) साज-या होणा-या ईदनिमित्त मिठाई खरेदी करण्यासाठी व भाविकांना देण्यासाठी या ट्रस्टतर्फे मशिदीला काही निधी देण्यात येईल.
हाफिझ मोहम्मह हनिफ हे गेल्या अनेक वर्षांपासून मशीदीत अझान अदा करतात व त्यांना या ट्रस्टतर्फेच निधी देण्यात येतो. हनिफ हे लहानपणापासूनच या मशिदीशी जोडले गेले आहेत, त्यांचे वडील मोरां मिया हेही या मशिदीशी निगडीत होते.