याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह, कंगना रणौतच्या विधानावर संतापले गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:41 PM2021-11-11T14:41:37+5:302021-11-11T14:56:03+5:30
कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपस्याचा अपमान, कधी त्यांच्या हत्याऱ्याचा सन्मान, आणि आता शहीद मंगल पांडेंपासू ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार.
नवी दिल्ली - बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंदी आहे. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावले आहेत. तसेच तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. आता एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील वक्तव्यामुळे कंगना ट्रोल होत आहे. काँग्रेस नेत्यांनीही कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. तर, वरुण गांधी यांनीही कंगनाच्या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे.
देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं कंगनाने म्हटलं आहे. त्यानंतर, वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केलाय.
कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपस्याचा अपमान, कधी त्यांच्या हत्याऱ्याचा सन्मान, आणि आता शहीद मंगल पांडेंपासू ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारधारेला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह? अशा शब्दात वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
कभी महात्मा गांधी जी के त्याग और तपस्या का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।
— Varun Gandhi (@varungandhi80) November 11, 2021
इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? pic.twitter.com/Gxb3xXMi2Z
वर्षा गायकवाड यांनीही लगावला टोला
इतिहास हा अतिशय महत्त्वाचा विषय असून सर्वच तरुण आणि विद्यार्थ्यांकडून त्याचा सखोल अभ्यास केला जातो. मात्र, इतिहासाच्या ज्ञानाचा अभाव असल्यानंतर अशा पद्धतीचं चुकीचं विधान केलं जातं, अशा शब्दात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कंगना रणौतला टोला लगावला आहे.
History is a very important subject and all students and youngsters must study it well. A lack of knowledge of history can lead to embarassing mistakes and misconceptions like the one below. pic.twitter.com/5Ub0A69CtZ
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 11, 2021
कंगनाला केलं जातंय ट्रोल
कंगनाच्या या स्वातंत्र्यासंदर्भातील विधानावरुन तिला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर कंगनाचा व्हिडिओ व्हायरल होत असून तिला नेटीझन्सकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. ट्विटर युजर रोफी गांधी या हँडलवरुन कंगनाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. लाकडाच्या घोड्यावर प्लॅस्टीकची तलवार घेऊन बसणारी वीरांगना, सरकारची बोली बोलणारी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांचा अपमान करत आहे. हजारो भारतीयांच्या बलिदांनाला भीक म्हणते आहे, असेही या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.