नवी दिल्ली - बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंदी आहे. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावले आहेत. तसेच तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. आता एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील वक्तव्यामुळे कंगना ट्रोल होत आहे. काँग्रेस नेत्यांनीही कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. तर, वरुण गांधी यांनीही कंगनाच्या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे.
देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं कंगनाने म्हटलं आहे. त्यानंतर, वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केलाय.
कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपस्याचा अपमान, कधी त्यांच्या हत्याऱ्याचा सन्मान, आणि आता शहीद मंगल पांडेंपासू ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारधारेला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह? अशा शब्दात वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
इतिहास हा अतिशय महत्त्वाचा विषय असून सर्वच तरुण आणि विद्यार्थ्यांकडून त्याचा सखोल अभ्यास केला जातो. मात्र, इतिहासाच्या ज्ञानाचा अभाव असल्यानंतर अशा पद्धतीचं चुकीचं विधान केलं जातं, अशा शब्दात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कंगना रणौतला टोला लगावला आहे.