नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील अत्याचारामुळे देश सोडाव्या लागलेल्या मजदकने दिल्ली विमानतळावर ‘तुम्ही मला कुत्रा म्हणा; परंतु पाकिस्तानी म्हणू नका,’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला होता. पाककडून बलुचिस्तान, तसेच गिलगिट भागातील लोकांवर अत्याचार करण्यात येत असल्याची चर्चा अनेकदा होते. तथापि, पाक नेहमीच हा आरोप फेटाळत आला आहे. मजदकच्या तीव्र भावनांमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे. काही बलोच स्थलांतरित नवी दिल्लीत राहतात. मजदक त्यापैकी एक. काही महिन्यांपूर्वी तो भारतात आला. त्याच्याकडे कॅनेडियन पासपोर्ट होता. तथापि, त्यावरील जन्मस्थानाच्या रकान्यात पाकमधील क्वेटा शहराचे नाव होते. त्यामुळे विमानतळावरील स्थलांतर अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्या वेळचा अनुभव कथन करताना मजदक म्हणाला की, ‘मी पाकिस्तानी नाही, हे स्थलांतर अधिकाऱ्यांना समजावून सांगताना मला प्रचंड वेदना होत होत्या. मी संतापून म्हणालो, मला कुत्रा म्हणा, काय वाटेल ते म्हणा, परंतु पाकिस्तानी म्हणू नको. मी बलोच आहे. माझ्या जन्मस्थळामुळे मला खूप अडचणी सहन कराव्या लागल्या.’ ही कहाणी एकट्या मजदकची नाही, तर पाक लष्कराने पिच्छा पुरविल्याने जगाच्या विविध भागांत आश्रय घेतलेल्या हजारो बलुच लोकांचीही हीच अवस्था आहे. मजदकच्या वडिलांचे अपहरण करण्यात आले होते. लष्कराने त्याच्या आईचा छळ करण्यासह संपत्तीचेही नुकसान केले. या कुटुंबाला कॅनडात आश्रय घ्यावा लागला. मजदक व त्याची पत्नी बलोच स्वातंत्र्य चळवळीबाबत जागृती घडवून आणण्यासाठी भारतात वास्तव्याला आहे. बलोच लोकांच्या ७० वर्षांपासूनच्या संघर्षाला भारताने पहिल्यांदाच उघडपणे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बलुचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मिरातील जनतेने माझ्याप्रती व्यक्त केलेल्या आपुलकीबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)मजदकचे वडील गुलाम मुस्तफा रायसानी चित्रपट दिग्दर्शक होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांचे अपहरण करून २००६ ते २००८ दरम्यान त्यांना क्वेट्टा येथे बंदीवासात ठेवले. त्याची आई राजकीय कार्यकर्ती आहे.मकजद महणाला की, वडिलांची सुटका झाल्यानंतर माझे कुटुंबीय कॅनडाला स्थलांतरित झाले. बलुच लोकांनी पाकचा देश म्हणून स्वीकार करावा, असे त्यांना वाटते. तसे न केल्यास त्यांना आमच्या देशांत वंशसंहार घडवायचा आहे. मी २०१० मध्ये अफगाणिस्तानला पळून गेला होता. नंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थलांतरित विभागाच्या उच्चायुक्तांमार्फत पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत मी कॅनडाला निघून गेलो.बलुचिस्तानातील संघर्षामुळे माझ्या भावा-बहिणींना योग्य शिक्षण मिळाले नाही. मी क्वेट्टातील शाळेत शिक्षण घेतले. तथापि, आता परिस्थिती बिकट झाली आहे. पाकने दर दहा कि.मी.वर मदरसे उघडले असून, निरपराध बलोच तरुणांना बहकवण्यात येत आहे. बलोच लोकांना शिक्षण मिळत नसल्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या नाहीत. इस्लामाबादने बलुचिस्तानातील सर्व कार्यालयांत पाकिस्तानी मुस्लिमांना नेमले आहे, तर त्याच्या लष्कराने संपूर्ण क्षेत्राला रणभूमी बनविले असून, तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली जात आहे, असेही तो म्हणाला. पाकचे ढोंग उघडआपल्याशी भारत किंवा बलुचिस्तानातील कोणत्याही भारतीय एजन्सीने संपर्क साधलेला नाही. बलुचिस्तान आंदोलनात भारतीय गुप्तचर संघटना रॉ चा हात असल्याचा आरोप पाककडून केला जातो. त्याबाबत तुला काय वाटते, या प्रश्नावर मजदक म्हणाला की, ‘मी बलुचिस्तानचा असून, तेथे दीर्घकाळ राहिलेलो आहे. मी एकाही भारतीय एजंटला पाहिले नाही किंवा कोणी माझ्याशी किंवा माझ्या कुटुंबाशी संपर्कही साधलेला नाही.’
मला कुत्रा म्हणा, परंतु पाकिस्तानी म्हणू नका; बलोची तरुणाचे उद्गार
By admin | Published: August 21, 2016 3:50 AM