हवाई दलाच्या सिव्हिल इंजिनियरची भल्या पहाटे गोळ्या निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे घडली आहे. एस. एन. मिश्रा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून, अज्ञात हल्लेखोराने राहत्या घरी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.
पुरामुफ्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बमरौली परिसरात असलेल्या सरकारी बंगल्यात मिश्रा हे वास्तव्यास होते. तिथे आज पहाटे अज्ञात हल्लेखोराने हाक देऊन त्यांना खिडकी उघडायला लावली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हा हल्लेखोर फरार झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय जागे झाले. तसेच त्यांनी मिश्रा यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी याबाबत माहिती देताना कुठल्यातरी वादातून ही हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तवली आहे. आता पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोघ घेत आहेत. एस. एन मिश्रा यांची पत्नी आणि मुलाने पोलिसांना सांगितले की, हल्लेखोराने हाक मारून खिडकी उघडून घेतली. त्यानंतर लगेच त्यांच्यावर गोळीबार केला. आमचं कुणाशी वैर नव्हतं, त्यामुळे आमचा कुणावरही संशय नाही, असे मिश्रा यांच्या पत्नी आणि मुलग्याने सांगितले. दरम्यान, पोलीस या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
या घटनेनंतर एसएचओ मनोज सिंह यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा नोंद केला जाईल. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या पोलीस आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.