नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या विदारक परिस्थितीसंदर्भात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावेळी, कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदींनी केवळ नौटंकी केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधींच्या या आरोपाला भाजपाकडून केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय.
राहुल गांधींनी कोरोनाबाबत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी, मोदींबद्दल बोलताना त्यांनी नौटंकी हा शब्दप्रयोग केला. यावरुन, भाजपाने राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसोबत कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. मोदींच्या या प्रयत्नांबद्दल राहुल गांधी नौटंकी हा शब्दप्रयोग करतात, हा देशाचा आणि देशातील जनतेचा अपमान आहे. आम्ही त्यांच्यासाठी नौटंकी हा शब्दप्रयोग करणार नाही, कारण त्यांची नौटंकी जनतेनं केव्हाच बंद केलीय, असं प्रकाश जावडेकर यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे म्हटले.
पाहा, व्हिडिओ
दुसऱ्या लाटेला मोदींची नौटंकीच कारणीभूत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये, कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचेही ते म्हणाले. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लसीकरण हाच उपाय
आम्ही केंद्र सरकारला कोरोनाबाबत वारंवार आठवण करुन दिली होती. त्यानंतरही, कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने विजय मिळवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. कोरोना हा तोंड वर काढणारा आजार आहे, यावर लॉकडाऊन आणि मास्क हा तात्पुरता उपाय आहे. केवळ लसीकरण हाच या आजारावरील कामयस्वरुपीचा उपाय असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं.
दरम्यान, देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर अद्याप धोका कायमच आहे. त्यामुळे, देशातील अनेक राज्यात अ्दयापही लॉकडाऊन असून जनजीवन पूर्ववत होण्यास अवधी लागणार आहे. त्यातच, गृहमंत्रालयाने 30 जून पर्यंत लॉकडाऊनबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे सूचवले आहे.