Delhi LG Atishi: अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री आतिशी यांचा उल्लेख कामचलावू मुख्यमंत्री केल्याच्या मुद्द्यावर दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी संताप व्यक्त केला. तुमचा असा उल्लेख करणे हा फक्त तुमचाच नाही, तर राष्ट्रपती आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझाही अपमान आहे, असे उप राज्यपालांनी म्हटले आहे. उप राज्यपालांना मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पत्रात म्हटले आहे की, "काही दिवसांपूर्वी तुमचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना तुम्हाला तात्पुरत्या आणि कामचलावून मुख्यमंत्री म्हटले. हे मला आक्षेपार्ह वाटले. हा केवळ तुमचा अपमान नाहीये, तर आपली नियुक्ती करणाऱ्या भारताच्या राष्ट्रपती आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझाही अपमान आहे."
"तात्पुरत्या किंवा कामचलावू मुख्यमंत्री म्हणून जी व्याख्या केजरीवाल यांनी केली आहे, त्याबद्दल संविधानात कोणतीही तरतूद नाहीये आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील लोकशाही भावनेचा आणि मूल्यांचा अवहेलना आहे", अशी टीका उप राज्यपालांनी केली आहे.
"मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळाची गरिमा डागाळत आहे"
उप राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे की, "ज्या प्रकारे केजरीवाल यांच्याकडून तुमच्या उपस्थितीत अनाधिकृतपणे वरिष्ठ नागरिक आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने महिलांशी संबंधित योजना हवेत घोषणा केल्या जात आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळाची गरिमा डागाळत आहे", असेही त्यांनी म्हटले आहे.
उप राज्यपाल घाणेरडे राजकारण करताहेत -मुख्यमंत्री आतिशी
उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या पत्रावर मुख्यमंत्री आतिशी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. "तुम्ही घाणेरडे राजकारण करण्याऐवजी दिल्लीच्या विकासावर लक्ष द्या. अरविंद केजरीवालांनी साडे नऊ वर्ष दिल्लीच्या भल्यासाठी काम केले. मी अरविंद केजरीवाल यांनी दाखवलेल्या मार्गानेच सरकार चालवत आहेत. दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवालांना वार वार जिंकून दिले आहे. महिला सन्मान योजनेत तुम्ही आडकाठी आणल्याबद्दल मी तुमच्याबद्दल वैयक्तिक दुखी आहे", असे मुख्यमंत्री आतिशींनी म्हटले आहे.