लखनौ - जर्मनीहून एक महिला 25 वर्षांपूर्वी भारतात फिरायला आली अन् मथुरेतील गायींच्या प्रेमात पडली. मथुरेच्या रस्त्यावर अन् गल्ली-बोळातच ती रमली. फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग असे या महिलेचं नाव असून रस्त्यावर फिरणाऱ्या गायींची सेवा केल्यामुळं भारत सरकारने पद्मश्री देऊन तिचा सन्मान केलाय. उत्तर प्रदेशातील मथुरेत फिरताना जमखी अन् भटकंती करणाऱ्या गायींचे हाल पाहून फ्रेडरिक यांचं मन हेलावल. त्यामुळं परत जर्मनीला न जाता, आता मथुरेत राहून अशा गायींची सेवा करण्याचा धाडसी निर्णय फ्रेडरिक यांनी 25 वर्षांपूर्वी घेतला होता.
केंद्र सरकारने 25 वर्षांपासून भटकंती करणाऱ्या गायींची सेवा करणाऱ्या या गो-मातेचा सन्मान केला आहे. 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये जर्मन नागरिक फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. गजबजलेल्या लोकांच्या वस्तीपासून दूर एका शांत आणि गलिच्छ परिसरात फ्रेडरिक यांनी 1800 पेक्षा अधिक गायी आणि त्यांच्या वासरांचा सांभाळ करत आहे. त्यामुळे, येथील स्थानिक लोकं फ्रेडरिक यांना सुदेवी माताजी असे म्हणतात.
61 वर्षीय फ्रेडरिक ब्रुनिंग यांना 1800 गायींचा सांभाळ करण्यासाठी दरमहा 35 लाख रुपयांचा खर्च येतो. कारण, या गोशाळेत 60 कर्मचारी काम करत आहेत. त्या 60 कर्मचाऱ्यांचे वेतन आणि येथील गायींच्या अन्न-पाण्यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. फ्रेडरिक यांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीतून दरमहा 6 ते 7 लाख रुपये मिळतात. या पुरस्कारामुळे मला अत्यंत आनंद झाला असून लोकांनी प्राणी मात्रांवर दया करावी, असा संदेश ब्रुनिंग यांनी देशातील नागरिकांना दिलाय.
मी एका छोट्याशा अंगणात या गोशाळेची सुरुवात केली होती. त्यानंतर, राधाकुंड येथील सुरभी गोशाला निकेतन नावाने एका गोशाळेची उभारणी केली. माझ्याजवळ असलेला सगळा पैसा मी या गोशाळेच्या उभारणीसाठी लावल्याचे ब्रुनिंग यांनी सांगितले. विशेष म्हणजे, फ्रेडरिक यांनी अंध आणि जखमी जनावरांसाठी स्वतंत्र वाडा उभारला आहे. आता, या जर्मन नागरिक असलेल्या फ्रेडरिक यांना भारत सरकारकडून लाँग टर्म व्हिजा किंवा भारतीय नागरिकत्व हवंय.