मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये एका विवाह सोहळ्यात चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नात पाहुण्या बनून आलेल्या दोन महिलांनी, १५ तोळे सोनं आणि चांदीचे दागिने भरलेली बॅग लंपास केल्याचं समोर आलं आहे. ही चोरीची घटना ग्वाल्हेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधा कृष्ण मॅरेज गार्डन येथे घडली आहे. येथे दतिया जिल्ह्यातील थरेट येथील रहिवासी उत्तम सिंह धाकड यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू होता.
या विवाह सोहळ्यात आलेल्या वरातीसोबत दोन संशयित महिलाही सहभागी झाल्या. कुटुंबातील सदस्य लग्न आटोपल्यावर डान्स आणि फोटो काढण्यात गुंतले. तेव्हा संधी साधून या महिलांना एक ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील मोठी बॅग ब्लेडने कापून त्यामध्ये ठेवलेली छोटी बॅग काढली.
चोरी केल्यानंतर महिलांनी ही बॅग कपड्यांमध्ये लपवली आणि झटपट लग्नाच्या गार्डनमधून फरार झाल्या. या बॅगेमध्ये सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने ठेवलेले होते. या दागिन्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये होते. दरम्यान, चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.