हैदराबाद - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपला प्रभाव पाडण्यासाठी राजकारणी आणि राजकीय पक्षांकडून विविध हातखंडे आजमावण्यात येत आहेत. जनमतावर पकड मिळावी यासाठी मोठमोठ्या सभांचे आयोजनही करण्यात येत आहे. मात्र या सभेसाठी माणसे मिळवताना नेतेमंडळींची दमछाक होत आहे. दरम्यान, सभेसाठी जमवलेल्या गर्दीवरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला काल फजितीला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली. मात्र सभा आटोपल्यावर संबंधितांकडून पैसे न मिळाल्याने सभेला आलेल्या लोकांनी रास्तारोको केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे झाले असे की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची एक मोठी सभा गुरुवारी खम्मम जिल्ह्यात झाली. या सभेसाठी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली. मोठ्या प्रमाणात गर्दी दिसावी यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून वाहने भरून लोकांना सभास्थळी आणण्यात आले. मात्र सभेला आल्यास पैसे देण्यात येतील, असे आश्वासन नेत्यांनी दिल्याचा आरोप अनेकांनी केला. तसेच पैसे न मिळाल्याने सभेला आलेल्या लोकांनी रास्ता रोको करत आंदोलन केले. त्यामुळे तिथे उपस्थित नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, जहीराबाद लोकसभा मतदारसंघातील अंडोल येथे सभेमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपा आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच संपूर्ण बहुमताचे सरकार असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्णपणे अपयशी ठरले, असा आरोपही त्यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे अपेक्षेनुरूप विकास करू शकले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला आले, पण पैसे नाही मिळाले; संतप्त लोकांनी रास्तारोको केले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 1:41 PM