मुंबई: माझा मुलगा ऑटिजमनं ग्रस्त असून त्याला सांडणीच्या दुधाची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे माझ्याकडे सांडणीचं दूध उपलब्ध नाही. कृपया मदत करा, असं ट्विट मुंबईतल्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या महिलेनं केलं. या ट्विटमध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं होतं. यानंतर वेगानं चक्र फिरली आणि थेट राजस्थानहून मुंबईत २० लिटर सांडणीचं दूध पोहोचवण्यात आलं. मुंबईतल्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या नेहा सिन्हा यांनी पंतप्रधान टॅग करून एक ट्विट केलं होतं. 'सर, माझा साडे तीन वर्षांचा ऑटिजमनं (स्वमग्नता) ग्रस्त असून त्याला खाद्य पदार्थांची गंभीर स्वरुपाची एलर्जी आहे. तो केवळ सांडणीचं दूध पितो आणि अतिशय मर्यादित प्रमाणात डाळी खातो. लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा माझ्याकडे सांडणीचं दूध पुरेशा प्रमाणात नव्हतं. राजस्थानच्या सादरीहून सांडणीचं दूध किंवा त्या दुधाची पावडर आणण्यासाठी मदत करा,' असं साकडं महिलेनं घातलं होतं.या ट्विटनंतर प्रशासकीय पातळीवर वेगानं चक्र फिरली. ओदिशा केडरचे आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांच्यापासून राजस्थानपर्यंतचे अधिकारी तातडीनं कामाला लागले. सिन्हा यांचं ट्विट पाहिल्यानंतर बोथरा यांनी वायव्य रेल्वेचे मुख्य प्रवासी परिवहन व्यवस्थापक तरुण जैन यांच्याशी संपर्क साधला. जैन यांनी वरिष्ठ व्यवस्थापक महेश चंद जेवालिया यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लुधियानाहून वांद्रे टर्मिनसला येणाऱ्या मालगाडीला अजमेरच्या फालना स्थानकात थांबण्याची सूचना देण्यात आली. विशेष म्हणजे फालना स्थानकातला हा थांबा पूर्वनियोजित नव्हता. सांडणीचं दूध पुरवणाऱ्या व्यक्तीसाठी फालना स्थानक जवळ असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. सांडणीच्या दुधाचं पार्सल घेण्यासाठी रेल्वे स्थानकातलं बुकिंग काऊंटर सुरू करण्यात आलं. ही मालगाडी रात्री वांद्रे टर्मिनसला पोहोचली. त्यानंतर साडे आठ वाजता महिलेच्या घरी २० लिटर सांडणीचं दूध (फ्रोजन) आणि २० किलो दूध पावडर पोहोचवण्यात आली.
CoronaVirus: आजारी मुलाच्या दुधासाठी आईचं थेट मोदींना ट्विट अन् थेट राजस्थानमधून २० लिटर दूध मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:36 PM