रायपूर : छत्तीसगढच्या जंगलात मानव-पशू यांच्यातील संघर्ष रोखण्याच्या प्रयत्नात हत्तीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी लवकरच हाय रिझोेल्युशनचे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या भागातील लोकांत मानव-पशू संघर्ष हा एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.वन (वन्य जीव) संरक्षक के. सी. बेबरता यांनी सांगितले की, उच्च तंत्रज्ञान असणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे अलर्ट प्रणालीला मजबुती मिळू शकते, असे आढळून आले आहे. हत्तींचा कळप गावात गेली तर त्यांचा शोध घेण्यात आणि वेळीच अलर्ट जारी करायला आम्हाला मदत मिळेल. जंगलाच्या परिसरातील लोक आणि वन्य पशू या दोघांच्या संरक्षणाची आमची योजना आहे. या दृष्टीने राज्य सरकारजवळ रायगढ जिल्ह्यातील घरमजायगट भागात प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव आहे. ‘ई आई’ (इलेक्ट्रॉनिक डोळा) या नावाच्या प्रणालीतहत रात्रीच्या अंधारातही काम करणारे कॅमेरे अधिक उंच ठिकाणी लावण्यात येतील. या कॅमेऱ्यांद्वारे एक किंवा दोन कि.मी. अंतरापर्यंत हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवली जाऊ शकेल. स्थिर राहणाऱ्या कॅमेऱ्यापेक्षा वेगळा असलेला हा कॅमेरा ३६० डिग्री कोनात फिरण्यास सक्षम असेल. ते झूम केले जाऊ शकतात किंवा घडामोडीचे चित्रीकरण केले जाऊ शकेल. त्यामुळे नियंत्रण कक्षात सतत फुटेज उपलब्ध होईल. त्यावर वन कर्मचारी नजर ठेवू शकतील, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.
जंगलात मानव-पशू संघर्षावर कॅमेराची नजर
By admin | Published: May 22, 2016 2:57 AM