तिरुअनंतपूरम- केरळमध्ये सबरीमाला मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशावरून हिंदू संघटनांनी मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. या हिंसाचारात ही सगळी घटना कॅमेऱ्यात टिपणाऱ्या माध्यम प्रतिनिधीवरही हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे आजूबाजूला हिंसाचार सुरू असतानाही डोळ्यांत पाणी दाटलेल्या या माध्यम प्रतिनिधीनं सगळी घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.तिचा तो रडतानाचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा वायरल होत आहे. केरळमधलं स्थानिक वृत्तपत्र असलेल्या मातृभूमीच्या एका महिला कॅमेरामनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. शाजिया अब्दुल रहेमान या पत्रकार महिलेवर शबरीमाला इथल्या आंदोलनादरम्यान हल्ला झाला होता. त्या महिलेच्या चेहऱ्यावरील हावभावावरून तिच्यावर हल्ले झाल्याचं स्पष्ट दिसतंय. ही महिला अश्रू लपवण्याचं काम करत होती. शाजिया म्हणते, जेव्हा मला कोणी तरी मागून धक्का मारला, तेव्हा मी अचंबित झाली.हा माझ्या व्यावसायिक करिअरमधला वाईट अनुभव होता. त्यामुळे मला रडू कोसळलं. आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या शाजियाला धमक्या आणि शिव्या घालण्यात आल्या. तिच्यावर हल्ला होत असतानाची घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली. शाजियानं ही घटना कॅमेऱ्यात कैद केल्यानं तिचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
'तो' हिंसाचार टिपणाऱ्या कॅमेरामन महिलेलाही रडू कोसळलं, तरीही तिनं कर्तव्य बजावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 9:06 PM