सुरत : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोटोग्राफर पडल्यानंतर विचारपूस केल्याच्या व्हिडिओनंतर काही वर्षांपूर्वी एका सभेदरम्यान पोलीस चक्कर येऊन पडला तरीही मोदींनी भाषण सुरुच ठेवल्याच्या व्हिडिओवरून मोदी ट्रोल झाले होते. मात्र, आज सुरत मधील एका सभेवेळी कॅमेरामन चक्कर येऊन बेशुद्ध झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लागलीच भाषण थांबविले आणि अधिकाऱ्यांना तातडीने अॅम्बुलन्स आणण्यास सांगितले.
नरेंद्र मोदी हे आज सुरतच्या दौऱ्यावर होते. तेथे मोदी यांनी सुरत विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे भूमीपूजन केले. यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी कॅमेरामन किशन रमोलिया यांना चक्कर येऊन खाली पडले. हे पाहताच मोदींनी भाषण थांबवत अधिकाऱ्यांना रुग्णवाहिका आणण्याचे आदेश दिले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून या कॅमेरामनला उचलून उपचारासाठी नेण्यात येत असल्याचे आणि मोदी उभे राहिल्याचे दिसत आहे. यानंतर मोदी यांनी आपले भाषण पूर्ण केले.
सभेच्या ठिकाणी पाणी नेण्य़ासही बंदी....हॉस्पिटलमध्ये नेलेल्या या कॅमेरामनने सांगितले की, सभेच्या ठिकाणी पाणी नेण्यास बंदी घालण्यात आली होती. यामुळे सकाळपासून पाणी न पिल्याने चक्कर आली. एक चांगले झाले की मोदी भाषणावेळी जवळपास पाहत होते. यामुळे माझ्यावर त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मदत करण्यास सांगितले.