- संजय शर्मानवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सुरत कोर्टाचा आदेश आणि खासदारकी रद्द होण्यास आव्हान न देण्यामागे व्हिक्टिम कार्ड खेळून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मोहीम चालवून त्यांना जिद्दी, अहंकारी व असभ्य भाषा वापरणारा नेता म्हणून प्रचाराची रणनीती तयार केली आहे.
२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांना एक वर्ष बाकी आहे; परंतु सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांचा पवित्रा पाहता २०२४च्या निवडणुकीची चाहूल लागली आहे व सर्वजण आपापले डावपेच आखत आहेत, असे दिसते. राहुल गांधींकडून कोर्टात माफी न मागणे व वरिष्ठ न्यायालयात अपील न करणे, यावरून भाजपमध्ये अस्वस्थता आहे. मोदी सरकार त्यांना जेलमध्ये टाकू इच्छित आहे, अगदी छोट्या कारणावरून संसद सदस्यत्व रद्द केले आहे, असा जनतेत संदेश देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
भाजप काय करणार?
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, भाजपला फार काही करायचे नाही, केवळ जनतेला आठवण करून द्यायची आहे. सर्व मोदींना बोलतील, तर प्रतिक्रिया उमटणारच. कोर्टाची माफी मागण्यात अहंकार आडवा येत आहे का? राहुल गांधी यांच्यावर छोटे-छोटे मीम तयार केले जात आहेत. त्यात त्यांना रागीट, जिद्दी, अहंकारी असभ्य बोलणारा नेता म्हणून दाखविले जात आहे. राहुल गांधी यांनी केव्हा-केव्हा कोणकोणती वक्तव्ये करून चुका केल्या, त्यांना कोठे माफी मागावी लागली याचा संपूर्ण लेखाजोखा देशाच्या जनतेसमोर ठेवण्यात येणार आहे.
राहुल गांधी हाजीर हो...पुन्हा समन्स
काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मानहानीच्या प्रकरणात सुरत येथील न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी गेली. आता पाटणा येथील न्यायालयाने त्यांना १२ एप्रिलला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. हे प्रकरणदेखील मोदी आडनावाशी संबंधित त्यांच्या वक्तव्याबाबतचे आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य व माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मोदी आडनावावरील वक्तव्याबाबत राहुल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
ललित मोदी राहुल यांना कोर्टात खेचणार
भारतात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले माजी आयपीएल प्रमुख ललित मोदी यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ब्रिटनमधील न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे. राहुल यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून आपण त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाणार आहोत, असे सांगत त्यांनी राहुल यांच्यावर टीकाही केली. आपल्यावर एकही आरोप सिद्ध झालेला नसताना काँग्रेस आपला सतत ‘फरार’ असा उल्लेख करत असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
अमेरिकेनंतर जर्मनीनेही नाक खुपसले...
राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेनंतर जर्मनीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल यांच्यावरील कोणतीही कारवाई ही न्यायिक स्वातंत्र्याच्या चौकटीत राहून व त्यांचे मूलभूत हक्क लक्षात घेऊन केलेली असेल, असा विश्वास असल्याचे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले. प्रवक्त्याने सांगितले, राहुल यांच्यावरील कारवाईवेळी किंवा त्यांची बाजू ऐकताना न्यायालयीन स्वातंत्र्य आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांची काळजी घेतली जाईल.