रघुनाथ पांडे, नवी दिल्लीकायद्याची बोगस पदवी देणारी टोळी उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तमिळनाडु राज्यात सक्रि य असल्याने देशभर बनावट वकिलांचा शोध सुरु झाला असून त्यातीलच एक टप्पा म्हणून महाराष्ट्र व गोव्यातील दीड लाख वकिलांच्या पदव्या, अनुभव आणि सनद तपासण्याचे काम सुरु झाले आहे.पंधरा सप्टेंबरपर्यंत ही तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना बार कौन्सिल आॅफइंडियाने (बीसीआय) दिल्या आहेत; मात्र वकिलांची संख्या मोठी असल्याने अजून दोन महिने लागतील, असे महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सचिव प्रवीण रणपिसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बीसीआयच्या सुचनेनुसार वकिलांना एक अर्ज तयार असून त्यावर सर्व तपशील द्यावे लागतील. जिल्हानिहाय तपशील भरावे लागत असल्याने हे काम मोठे आहे. ही माहिती फायदेशीर असेल असे दिसून येते, असेही रणपिसे यांनी स्पष्ट केले.बोगस वकिलांमुळेच वकिली व्यवसायाला मानहानी सहन करावी लागत आहे, असे मत बार कौंसिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर केंद्रीय विधी मंत्रालयाने बनावट वकिलांचा शोध घेण्याच्या सूचना बीसीआयला दिल्या. विशेष म्हणजे हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने देशातील २१ खासदारांनी केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांना याबाबत विचारणा केली; यात महाराष्ट्रातील नऊ खासदार आहेत.
बनावट वकिलांच्या शोधासाठी देशभर मोहीम!
By admin | Published: August 31, 2015 1:10 AM