- असिफ कुरणे
भोपाळ : मध्यप्रदेशात प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. पारंपरिक प्रचार साधनांसोबत आधुनिक साधनांचा वापर होत आहे. पण यंदा प्रचाराचा सर्वांत टोकदार वापर व्हॉटस्अॅपद्वारे होत आहे. विरोधकांच्या विरोधात वातावरण तयार करण्यापासून, त्यांच्या चुकीचा बोभाटा करण्यासाठी व्हॉटस्अॅपचा सर्वाधिक वापर होत आहे.कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची असा चंग बांधून मैदानात उतरलेल्या भाजपा व काँग्रेसने बूथ पातळीपर्यंतचे नियोजन केले आहे. पण यावेळच्या निवडणुकीत प्रचाराचे सर्वांत प्रभावी अस्र ठरत आहेत ते म्हणजे व्हॉटस्अॅप हे सोशल मीडिया अॅप. मध्य प्रदेशात ७ कोटी मतदार असून, त्यापैकी ४.५ कोटी (६० टक्के) मतदारांकडे स्मार्टफोन आहेत. इतर सोशल माध्यमांशी तुलना करता यातील बहुतांश सर्वांकडे व्हॉटस्अॅप उपलब्ध आहे. इतक्या साऱ्यामतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा व काँग्रेसकडून जवळपास दीड लाख सोशल मीडियातज्ज्ञ नेमले आहेत.भाजपा व काँग्रेसने दोन लाखांहून जास्त व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केले आहेत. त्याद्वारे बूथ, गाव, विभाग, मतदारसंघ पातळीवर आपापल्या पक्षाचा प्रचार सुरू आहे. तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने ७० हजारांहून अधिक ‘सायबर योद्धे’ नेमले आहेत. काँग्रेसने त्यांना ‘सायबर शिपाई’ असे नाव दिले आहे. फेसबुक, टिष्ट्वटर किंवा इतर सोशल मीडिया अॅपच्या तुलनेत व्हॉटस्अॅप हे वैयक्तिक, वापरण्यास सोपे, जलद मेसेजिंगसाठी प्रसिद्ध असल्यामुळे त्याचा वापर वाढला आहे.मतदारसंघनिहाय प्रचाराची रणनीती, स्थानिक संदर्भ, घडामोडी, विरोधकांच्या चुका तात्काळ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नेत्यांना हे साधन सोयीचे ठरत आहे. त्याचा वैयक्तिक प्रभाव जलद होत असल्याने यावरील प्रचार हुकमी एक्का ठरेल, असा विश्वास सायबरतज्ज्ञांना आहे.निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने ३० हजार, तर भाजपने ३५ हजार ग्रुप तयार करून आपला प्रचार सुरू केला होता. आता ही संख्या लाखाच्या घरात गेली आहे. येत्या आठ दिवसांत व्हॉट्सअॅप प्रचारयुद्ध वाढण्याची शक्यता आहे.व्हायरल व्हिडिओंची लाटमतदानांची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे व्हॉटस्अॅपवर व्हायरल व्हिडिओंची लाट आली आहे. जितू पटवारी यांची महिलांविषयीची शेरेबाजी, कमलनाथ यांची मुस्लीम नेत्यांसोबतची बैठक, ज्योतिरादित्य शिंदे पुष्पहार फेकत असल्याची घटना, शिवराजसिंह चौहान यांच्या पत्नी व मुलांशी मतदारांची केलेली वादावादी असे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहे.बसंती की इज्जत का सवाल!शोले या चित्रपटात गब्बर सिंगचे (अमजद खान) दरोडेखोर बसंती (हेमा मालिनी)च्या मागे लागतात, तेव्हा ती आपल्या टांग्यात बसून, धन्नो नावाच्या घोडीला उद्देशून ‘चल धन्नो, बसंती की इज्जत का सवाल है’ असे म्हणते. तो डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे. मध्यप्रदेशातील एका प्रचार सभेमध्ये सर्व मतदारांना भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी हाच डायलॉग ऐकवून भाजपासाठी मते मागितली.हरदा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कमल पटेल यांच्या प्रचारासाठी हेमा मालिनी यांनी सभा घेतली. त्या सभेत, ‘ये बसंती तांगेवाली आज आपके शहर में आयी है और उसकी इज्जत का सवाल है’ असा डायलॉग ऐकवून कमल पटेल यांनाच मते द्या, असे आवाहन केले.देवांना पत्रे : निवडणूक घोषित होण्यापूर्वी राज्यात देवांच्या नावाने पत्रे वेगाने व्हायरल झाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी भगवान महाकाल यांना लिहिलेले पत्र, त्यावर नंदीकडून कमलनाथांना आलेले उत्तर ( नंदी का कमलनाथ को जवाब ) तसेच भगवान महाकाल यांनी नंदीला लिहिलेले पत्र भलतेच व्हायरल झाले होते. त्याची मोठ्या प्रमाणात राज्यभरात चर्चाही झाली होती.