गुजरात निवडणुकीच्या प्रचारामध्ये या बाबतीत राहुल गांधींनी घेतली मोदींवर आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 02:43 PM2017-11-17T14:43:56+5:302017-11-17T14:46:00+5:30
गुजरातमध्ये मोदींना मात देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. प्रचारसभा, रोड शो, मतदारांच्या गाठीभेठी याच्या माध्यमातून राहुल गांधींनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे.
अहमदाबाद - गुजरातमध्ये मोदींना मात देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. प्रचारसभा, रोड शो, मतदारांच्या गाठीभेठी याच्या माध्यमातून राहुल गांधींनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. दरम्यान, मोदींच्या प्रखर हिंदुत्ववादी प्रतिमेला शह देण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाला जवळ केले असून, आपण हिंदू विरोधक नाही याची ग्वाही देण्यासाठी राहुल गांधींनी गुजरातमधील प्रसिद्ध मंदिरांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मंदिरांना भेटी देण्याच्याबाबतीत राहुल गांधींनी मोदींवर आघाडी घेतली आहे. राहुल गांधींनी विधानसभेच्या प्रचारादरम्यान 20 मंदिरांना भेट दिला आहे. तर राहुल गांधींशी तुलना करायची झाल्यास 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी केवळ 6 मंदिरांनाच भेट दिली होती.
राहुल गांधी यांनी 28 सप्टेंबरला गुजरात विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात करताना पाच मंदिरांना भेट दिली होती. त्यावेळी ते द्वारकाधीश मंदिर, कागवाड येथील खोडलधाम, वीरपूरमधील जलाराम मंदिर, चोटिला मंदिर आणि राजकोट येथील दासी जीवन मंदिराला भेट दिली होती.
त्यानंतर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांनी नादियाड येथील शांताराम मंदिर, खेडा येथील रणछोड राय मंदिर आणि भाठीजी येथील महाराज मंदिर आणि पावगडमधील महाकाली माता मंदिराला भेट दिली होती.
त्यानंतर प्रचार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांनी दक्षिण गुजरातचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरातून प्रचाराची सुरुवात केली होती. त्यानंतर मेहसाणा येथील बहुचराजी मंदिर, वलीनाथ मंदिर, पाटण येथील वीर मेघमाया मंदिर आणि वारन येथील खोडियार मंदिराला भेट दिली होती.
राहुल गांधीच्या मंदिरांना भेटी देण्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचा एक कार्यकर्ता म्हणाला, "नरेंद्र मोदी धार्मिक आहेत. ते जिथे जातात तेथे मंदिरांमध्ये आवर्जुन जातात. पण सध्या प्रचारादरम्यान मंदिरांना भेट देण्याची तुलना केली तर राहुल गांधी मोदींपेक्षा खूप पुढे आहेत. तसेच राहुल गांधी यांनी भेद दिलेल्या मंदिरांपैकी बहुतांश मंदिरांमध्ये नरेंद्र मोदी 2001 नंतर झालेल्या निवडणुकांदरम्यान कधीही गेलेले नाहीत."