संसदेत चलनी नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का? जाणून घ्या काय आहेत नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:04 IST2024-12-06T14:57:54+5:302024-12-06T15:04:40+5:30
राज्यसभेत चलनी नोटा सापडल्यामुळे मोठा गदारोळ सरू आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

संसदेत चलनी नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का? जाणून घ्या काय आहेत नियम
राज्यसभेत नोटांचे बंडल सापडल्याने गदारोळ झाला. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी नोटा सापडल्याची माहिती दिली. हे नोटांचे बंडल सीट क्रमांक २२२ वर सापडले असल्याचे त्यांनी सांगितले. ही जागा काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. यावरुन आता गदारोळ सुरू आहे.
अध्यक्ष धनखड म्हणाले की, गुरुवारी सुरक्षा अधिकाऱ्यांनी माहिती दिली की सीट क्रमांक २२२ जवळ रोख रक्कम सापडली आहे. या प्रकरणाचा तपास नियमानुसार सुरू आहे.
नोटांचे बंडल सापडल्याची माहिती समोर येताच राज्यसभेत गदारोळ सुरू झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सिंघवी यांचे नाव घेतल्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सर्वकाही स्पष्ट होत नाही तोपर्यंत अध्यक्षांनी सिंघवी यांचे नाव घ्यायला नको होते. खरगे यांच्या आरोपांवर सभापती धनखड म्हणाले की, कोणत्या जागेवर रोख रक्कम सापडली आणि ती सीट कोणाची आहे हे सांगितले आहे.
सिंघवींनी दिले स्पष्टीकरण
खासदार सिंघवी म्हणाले, , 'हे मी पहिल्यांदाच ऐकले आहे, मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा ५०० रुपयांची नोट सोबत घेतो. काल दुपारी १२.५७ वाजता मी सदनमध्ये पोहोचलो आणि १ वाजता सदन सुरू झाले. त्यानंतर मी खासदार अयोध्या रामी रेड्डी यांच्यासोबत दुपारी दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो आणि मग संसदेतून बाहेर पडलो, असं स्पष्टीकरण मनू सिंघवी यांनी दिले.
संसदेत चलनी नोटा घेऊन जाऊ शकतो का?
संसदेत नोटा आणाव्यात की आणू नये असा काही नियम नाही. कोणताही खासदार किती चलन आत घेऊन जाऊ शकतो यावर मर्यादा नाही. असे अनेक खासदार आहेत जे डिजिटल पेमेंटचा वापर करत नाहीत, ते संसदेच्या आतील बँकेच्या शाखेतून पैसे काढतात आणि चेंबरमध्ये घेऊन जातात.
सीटजवळील नोटांचे हे बंडल कुठून आले याची चौकशी केली जाईल. अभिषेक मनू सिंघवी यांनी फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन सभागृहात जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता हे सर्व राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर अवलंबून आहे की ते दिल्ली पोलिसांकडे तपास सोपवतात की अन्य एजन्सीकडे देतात.