नवी दिल्ली : जगभरात हैदोस माजविणारी इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात कुठेही एकट्या दहशतवाद्याचा (लोन वुल्फ) वापर करून हल्ला करूशकते, अशी शक्यता केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी वर्तविली आहे. सोबतच अशा कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलताना रिजिजू यांनी सांगितले की, आव्हाने निश्चितच आहेत आणि आम्ही ती स्वीकारली पाहिजेत. वास्तवापासून दूर पळता येणार नाही. २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इसिसकडून एकट्या दहशतवाद्याच्या माध्यमाने देशात हल्ले होऊ शकतात काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. उत्तर भारतातील राज्यांमधील मुस्लिमांच्या तुलनेत दाक्षिणात्य राज्यांमधील मुस्लिम इसिसच्या विचारसरणीकडे अधिक आकर्षित होतात, असे वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केले. दक्षिण भारतातील काही मुस्लिमांचा कल इसिसकडे असून ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही; परंतु आम्हाला देशाच्या इतर भागांतही कडक पाळत ठेवावी लागणार आहे, असे रिजिजू यांचे म्हणणे होते. इसिसच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने कुठली तयारी केली आहे? या प्रश्नाच्या उत्तरात रिजिजू यांनी सांगितले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने सुरक्षा यंत्रणा बळकट केली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
इसिस करू शकते ‘लोन वुल्फ’ हल्ले
By admin | Published: November 29, 2015 3:07 AM