नवी दिल्ली : कर्मचारी पेन्शन योजनेच्या (ईपीएस) वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जुलै २०२३ पर्यंत आहे. ईपीएसकडून पेन्शन मिळत असलेल्या व्यक्ती वाढीव पेन्शनसाठी अर्ज करू शकतात का, असा प्रश्न समोर आला आहे. त्याबाबत जाणून घेऊ. वाढीव पेन्शनसाठी पात्र कर्मचारीच अर्ज करू शकतात.
फॅमिली पेन्शनधारकांसारखे लाभार्थी वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. इंडसलॉचे भागीदार वैभव भारद्वाज यांनी सांगितले की, वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास पात्र कोण? हा मुद्दा संदिग्ध आहे. ईपीएस फॅमिली पेन्शन घेणाऱ्या वैवाहिक जोडीदारांना अर्ज करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमी दिसते. वाढीव वेतनावर वाढीव पेन्शन दिली जाणार आहे. त्यामुळे केवळ कर्मचारीच त्यासाठी अर्ज करू शकतो.
कोर्टाने काय म्हटले?४ नोव्हेंबर २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने म्हटले की, १ सप्टेंबर २०१४ पूर्वीच्या आवश्यकतेनुसार ईपीएफ खात्यात ५ हजार आणि ६,५०० रुपयांच्या वेतन मर्यादेच्या वर योगदान देणारेच वाढीव पेन्शनसाठी अर्ज करू शकतात.
पुढील कर्मचारी पात्र १असे कर्मचारी जे १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेले आहेत, तसेच त्यांनी वाढीव पेन्शनचा पर्याय निवडला आहे. २. असे कर्मचारी जे १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवेत होते तसेच १ सप्टेंबर २०१४ नंतरही ज्यांची सेवा सुरू राहिली आहे. मात्र, त्यांनी वाढीव पेन्शन पर्याय निवडलेला नाही.
पीपीएफ खाते मॅच्युअर झाल्यानंतर काय कराल?७.१ टक्के दराने चक्रीवाढ व्याज देणारी ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ (पीपीएफ) योजना १५ वर्षांत परिपक्व (मॅच्युअर) होते. परिपक्वतेच्या वेळी गुंतवणूकदारास ३ पर्याय दिले जातात. याबाबत जाणून घेऊया.
पर्याय १ : पीपीएफ योजना परिपक्व झाल्यानंतर गुंतवणूकदार सर्व रक्कम व्याजासह काढू शकतो. त्यासंबंधीचा फॉर्म तुम्ही खाते काढलेल्या बँकेत अथवा पोस्ट ऑफिसात भरल्यानंतर व्याजासह संपूर्ण रक्कम तुमच्या बचत खात्यात हस्तांतरित केली जाते.पर्याय २ : पीपीएफ परिपक्व झाल्यानंतर आणखी ५ वर्षे पुढे सुरू ठेवता येते. त्यासाठी परिपक्वतेच्या तारखेनंतर १ वर्षाच्या आत तुम्हाला वाढीव मुदतीचा एक अर्ज करावा लागतो. मुदतीत अर्ज न दिल्यास तुम्ही या खात्यात योगदानाचे पैसे जमा करू शकणार नाहीत. वाढीव ५ वर्षांत गरज पडल्यास पैसे काढताही येतात.पर्याय ३ : १५ वर्षांनंतर गुंतवणूक बंद करून तुम्ही जमलेली रक्कम नुसतीच खात्यावर जमा ठेवू शकता. त्या रकमेवर व्याज मिळते. त्यासाठी तुमची बँक अथवा पोस्ट ऑफिसला तसे कळवावे लागते.
५ लाखांचे १० लाख कसे कराल?पीपीएफ खात्याद्वारे थोडी थोडी रक्कम जमा करून मोठी रक्कम उभी करता येते. उदा. दरमहा २,००० जमा केल्यास तुमचे वर्षाला २४,००० रुपये व १५ वर्षांत ३,६०,००० रुपये जमा होतात. ७.१ टक्के दराने त्यावर २,९०,९१३ रुपये व्याज मिळेल. म्हणजेच १५ वर्षांनी ६,५०,९१३ रुपये मिळतील. ही योजना आणखी ५ वर्षांसाठी सुरू ठेवल्यास १०,६५,३२६ रुपये तुम्हाला मिळतील.