प्रश्न - मी नुकतेच व्हिसा शुल्क भरले आणि मुलाखतीची तारीख निश्चित केली. पण कामाच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे मला ठरलेल्या दिवशी मुलाखतीला हजर राहता येणार नाही. मला माझी मुलाखतीची तारीख बदलता येईल का ?
उत्तर - हो, तुम्ही तुमची मुलाखतीची तारीख बदलून घेऊ शकता. महत्वाच्या कामामुळे तुमच्या वेळापत्रकात बदल होतो हे आम्ही समजू शकतो. वर्षभरात पाचवेळा तुम्ही तुमची मुलाखतीची वेळ बदलून घेऊ शकता. त्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
व्हिसा अर्जाची प्रक्रिया शक्य तितकी सहज सोपी ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. व्हिसा मिळवण्यासाठी बहुतांश उमेदवारांना दोनवेळा यावे लागते. एकदा बायोमेट्रीक तपासणीसाठी तर, दुस-यांदा मुलाखतीसाठी. बायोमेट्रीक तपासणीमध्ये डोळे, बोटांचे ठसे घेतले जातात. व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरमध्ये बायोमेट्रीक तपासणी होते तर, स्थानिक अमेरिकन दूतावासामध्ये मुलाखत होते. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये मुलाखत आणि बायोमेट्रीक तपासणी होते.
सलग दोन दिवसांमध्ये या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सवलतीनुसार वेळ ठरवू शकता. फक्त दोन नियम तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे. मुलाखतीच्या एक दिवस आधी तुम्हाला बायोमेट्रीक तपासणीसाठी हजर रहावे लागते. बायोमेट्रीक तपासणीनंतर 50 दिवसांच्या आत तुम्हाला मुलाखत देणे बंधनकारक आहे.
तुम्हाला तुमची मुलाखतीची तारीख बदलायची असेल तर, त्यासाठी तीन प्रक्रिया आहेत. www.ustraveldocs.com/in या वेबसाईटद्वारे मुलाखतीची नवीन तारीख मिळवू शकता. support-india@ustraveldocs.com. या संकेतस्थळावर ई-मेल पाठवूनही तारीख बदलून घेता येईल किंवा +91 120 4844644 or +91 40 46258222 या दूरध्वनी क्रमांकावर ग्राहकसेवा कक्षाला फोन करुन मुलाखतीची वेळ बदलून घेता येईल.
त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही भरलेली व्हिसा फी तुम्हाला परत मिळत नाही. पाचवेळा तुम्ही मुलाखतीची वेळ बदलू शकता. पण वर्षभरात एकदाही तुम्हा मुलाखतीसाठी येणे शक्य झाले नाही तर, तुम्हाला व्हिसासाठी नवीन फी भरावी लागेल.