प्रश्न- माझ्याकडे सध्या अमेरिकेचा वैध टुरिस्ट (बी1/बी2) व्हीसा आहे. पुढील महिन्यापासून माझा अमेरिकेत पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे आणि मी स्टुंडट (एफ1) व्हीसासाठी अर्ज करणार आहे. मला एकाचवेळेस दोन व्हीसा बाळगता येतील का? जर माझ्याकडे एकापेक्षा अधिक व्हीसा असतील तर कोणत्या व्हीसावर मी अमेरिकेला जावे?
उत्तर- हो. एकाचवेळी दोन व्हीसा (जसे की टुरिस्ट, स्टुडंट व्हीसा) तुमच्याकडे असूशकतात. प्रत्येक व्हीसा संबंधित हेतू दर्शवतो आणि तुम्ही योग्य त्या कामासाठीच तो व्हीसा वापरला पाहिजे. जर तुम्ही अमेरिकेत एखादा अभ्यासक्रम किंवा ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला स्टुडंट व्हीसा लागेल. असे अभ्यासक्रम किंवा ट्रेनिंग तुम्ही टुरिस्ट व्हीसावर पूर्ण करु शकत नाही.
अमेरिकेत जेथे प्रवेश कराल तेथे तुम्हाला स्टुडंट व्हीसा आणि फॉर्म आय-20 (तुमच्या शैक्षणिक संस्थेने दिलेले कागदपत्र) इमिग्रेशन ऑफिसरला सादर करावे लागते. शिक्षण किंवा ट्रेनिंगसाठी तुम्ही जात नसाल आणि पर्यटनासाठी अमेरिकेत जात असाल तर तुम्हाला टुरिस्ट व्हीसा घेणे आवश्यक आहे.तुम्ही प्रथमच स्टुडंट व्हीसावर अमेरिकेत जात असाल तर तुमचा अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी 30 दिवसांपेक्षा जास्त काळ आधी अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळत नाही. तुमच्या अभ्यासक्रम सुरु होण्याची अदिकृत तारिख आय-20 फॉर्मवर लिहिलेली असते. काही विद्यार्थी तेथे राहाण्यासाठी जागा शोधणे किंवा मित्र-आप्तांना भेटण्यासाठी 30 दिवसांहून आधी तेथे जाऊ शकतात. जर तुम्हाला असे करायचे असेल तर टुरिस्ट व्हीसावर प्रवास करावा लागेल. त्यानंतर अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी यू.एस. सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्विसेस (युसिस) येथए जाऊन व्हीसाबदल करण्यासाठी अर्ज करावा लागेल. किंवा अमेरिकेतून बाहेर पडून पुन्हा जेथे अमेरिकेत प्रवेश कराल तेथे स्टुडंट व्हीसा सादर करता येईल.