पटेलांचा राजकीय द्वेषासाठी वापर करणे मोदींना शोभते?-सिंगवी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:34 AM2018-10-22T04:34:38+5:302018-10-22T04:34:48+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या हयातीत सांप्रदायिक विचारांच्या हिंदू महासभा व मुस्लिम लीगला कडाडून विरोध केला.
नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या हयातीत सांप्रदायिक विचारांच्या हिंदू महासभा व मुस्लिम लीगला कडाडून विरोध केला. दोन्ही संघटनांच्या विरोधात अनेक लेख लिहिले. रा.स्व. संघ अन् नेताजी सुभाषबाबूंची विचारसरणी पूर्णत: भिन्न होती. नेताजींनी काही काळ काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले.
त्यानंतर ज्या फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली तो पक्ष आजही भाजपच्या कट्टर विरोधात उभा असलेला डाव्या विचारांचा पक्ष आहे. स्वातंत्र्यापूर्वी दिवंगत झालेल्या सुभाषबाबूंना अन् देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीआधीच ज्यांचे देहावसान झाले, त्या वल्लभभाई पटेलांच्या प्रतिमेचा केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी वापर करणे पंतप्रधानांना शोभते काय? असा हल्ला काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंगवी यांनी केला.
पंतप्रधान मोदींनी आझाद हिंद सेनेच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात काँग्रेसवर जे आरोप केले ते धादांत असत्य असल्याचे नमूद करीत सिंगवी म्हणाले, आझाद हिंद सेनेवर ब्रिटिशांनी देशद्रोहाचा खटला भरला. लाल किल्ल्यात चाललेल्या या खटल्याच्या कामकाजाला आयएनए ट्रायल म्हणून संबोधले जाते. या खटल्यात पंडित नेहरू वकील या नात्याने आझाद हिंद सेनेच्या बाजूने उभे राहिले होते. पंतप्रधान या नात्याने पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य चळवळीतील सुभाषबाबूंच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
सुभाषबाबूंवर बोलण्याआधी मोदींनी त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायला हवे होते. आपल्या हयातीत नेताजींनी नॅशनल प्लॅनिंग समितीची निर्मिती केली होती. स्वातंत्र्यानंतर त्याचे प्लॅनिंग कमिशनमध्ये रूपांतर झाले. मोदींनी मात्र हे प्लॅनिंग कमिशन उद्ध्वस्त करून त्याला निति आयोगाचे स्वरूप दिले, असेही सिंगवी म्हणाले.