ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - कलात्मक स्वातंत्र्याचा गैरवापर करत राष्ट्रपिता महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या थोर व्यक्तींचा अपमान करता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे. 'गांधी मला भेटला होता' या कवितेसंदर्भात झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी व ऑल इंडिया बँक कर्मचारी असोसिएशनच्या मासिकाचे संपादक देवीदास तुळजापूरकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तुळजापूरकर यांनी १९९४ मध्ये त्यांच्या मासिकात कवी वसंत गुर्जर यांची 'गांधी मला भेटला होता' ही कविता छापली होती. या कवितेमध्ये महात्मा गांधींजीविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप असून याप्रकरणी तुळजापूरकर यांच्यावर आयपीसीतील कलम २९२ अंतर्गत ठपका ठेवण्यात आला आहे. या कलमांतर्गत अश्लील साहित्याचे प्रकाशन व विक्री करणे गुन्हा असून या दोषी ठरल्यास २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. माझ्यावर ठेवण्यात आलेला ठपका रद्द करावा अशी याचिका तुळजापूरकर यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाचे न्या. दिपक मिश्रा व प्रफुल्ल संत यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते तुळजापूकर यांना सुनावले आहे.
'गांधीजींना देशात उच्च स्थान आहे. विचारांचे स्वातंत्र्य व शब्दांचे स्वातंत्र्य यात खुप फरक आहे. विचारांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही गांधीजींच्या तोंडी असभ्य शब्द टाकून कविता करु शकत नाही. महाराणी व्हिक्टोरिया संदर्भात तुम्ही असे केले असते तर ब्रिटीशांनी काय प्रतिक्रिया दिली असती असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाषेच्या स्वातंत्र्यावर आमचा आक्षेप नसून भाषा स्वातंत्र्याच्या नावाखाली गांधीवर आक्षेपार्ह टीका करणे यावर आमचा आक्षेप आहे असे कोर्टाने स्पष्ट केले. ही कविता मराठी भाषेतील विडंबनात्मक काव्य आहे असा बचाव तुळजापूरकर यांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला आहे.