ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - काश्मिरी तरुणाला जीपला बांधणारे मेजर नितीन गोगोई यांना लष्कराने सन्मानित केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून वाद उफाळून आला होता. त्याच पार्श्वभूमीवर लष्कराच्या जीपवर काश्मिरी युवकाला बांधणा-या मेजर नितीन गोगोई यांचं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी समर्थन केलं आहे. यावेळी रावत यांनी जवानांचं कौतुक करत काश्मीरमधील "डर्टी वॉर"शी दोन हात करण्यासाठी नवनव्या पद्धतींचा शोध लावण्याची गरज असल्याचंही मतंही मांडलं आहे. ज्यावेळी लोक बॉम्ब आणि दगडफेक करत असतील त्यावेळी मी आमच्या लोकांना सर्वकाही पाहत राहून मरण्यासाठी सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, आंदोलकांनी दगडफेकीऐवजी गोळीबार केला असता तर मला फारच आनंद झाला असता. काश्मीरच्या मुद्द्यावर ठोस उपाय करण्याची गरज आहे. तसेच यात प्रत्येकाला सामावून घेतले पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जीपवर स्थानिक तरुणाला बांधणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर फुटीरतावादी नेते आणि काही राजकीय पक्षांनी त्या मेजरवर टीकेची झोड उठवली होती. तर दुसरीकडे केंद्र सरकारने या मुद्द्यावर लष्कराला साथ दिली आहे. नितीन गोगोई यांनी माध्यमांचा या घटनेचा वृत्तांत सांगितला होता.
काश्मिरी युवकाला जीपला बांधण्याचा निर्णय आपल्याला का घ्यावा लागला ? त्यावेळी काय परिस्थिती होती त्याची गोगोई यांनी विस्तृत माहिती दिली होती. "काश्मीरमध्ये निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी शांतता राखण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मला मतदान केंद्रावर दगडफेक होत असल्याचे समजल्यानंतर मी तिथे गेलो. चार निवडणूक कर्मचारी आणि सात आयटीबीपीच्या जवानांची सुटका केली. आम्ही बाहेर आलो तेव्हा आमच्यावर सर्व बाजूंनी दगडफेक सुरु होती. दगडफेक करणारे आमच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकत होते. अशा परिस्थिती स्थानिक आणि निवडणूक कर्मचा-यांना वाचवण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधण्याचा निर्णय घ्यावा लागला," असे मेजर गोगोई यांनी सांगितले होते.
मेजर नितीन गोगोई यांना नुकतेच दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आले होते. लष्कराने गोगोई यांच्यावर होत असलेल्या टीकेला झिडकारून लावत त्यांचा सन्मान केला आहे. एक सर्वसामान्य जवान ते आर्मी सर्व्हिस कॉपमध्ये मेजरच्या हुद्यापर्यंत पोहोचलेल्या गोगोई यांच्या एका युवकाला जीपला बांधून मानवी ढाल बनवण्याच्या कृतीवर फार टीका झाली होती. गोगोई यांच्यावर मानवाधिकार आणि जिनेव्हा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता.