एस. पी. सिन्हापाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे. बिहारमध्येराजकारण करणे हे दिल्लीतील राजकारणापेक्षा जास्त कठीण आहे, असे जाणकारांचे मत आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या यशाचे कारण वेगळे आहे; परंतु बिहारच्या राजकारणात ठसा उमटविण्यासाठी जेपी आंदोलनाच्या धर्तीवर नवीन परिभाषा तयार करावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेपी आंदोलनामुळे झालेला सत्ताबदल व केजरीवाल यांना मिळालेले यश या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु जातिधर्माची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांच्यासाठी रस्ता सोपा नसल्याचे समजले जात आहे.जाणकारांचे म्हणणे आहे की, जेपींनी ५ जून १९७४ रोजी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. तेव्हा पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानात पाच लाख लोक जमा झाले होते. संपूर्ण क्रांतीमध्ये सात क्रांती समाविष्ट होत्या.
आज किंवा उद्या रणनीती ठरविणार
प्रशांत किशोर यांची स्वत:च्या मूळ राज्यात राजकारणात उतरण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते नीतीशकुमार यांचे रणनीतीकार व सल्लागार होते, त्या कालावधीत संवादाच्या वेळीही ‘जदयू’चे नेते व कार्यकर्त्यांना हे प्रकर्षाने जाणवले होते. काहींना तर असे वाटू लागले की, ते नितीशकुमार यांचे उत्तराधिकारी बनू इच्छित आहेत की काय? दोन वर्षांपूर्वी त्यांना जदयूमधून काढून टाकले होते. त्यांनी भाजप, जदयू, काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, आदी पक्षांसाठी वेगवेगळ्या काळासाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केलेले आहे. काही ठिकाणी त्यांना यश मिळाले, तर काही ठिकाणी ते सपशेल अयशस्वी झाले. अशा प्रकारे त्यांची ओळख मुख्यत्वे करून व्यावसायिक रणनीतीकार म्हणूनच राहिली आहे.
- आता ते बिहारच्या राजकारणात ठसा उमटवू इच्छित आहेत; परंतु बिहारमध्ये समाजवादी आंदोलनाची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत.
- बिहारच्या राजकारणातील आजचे प्रमुख चेहरे जेपी आंदोलनातूनच पुढे आलेले आहेत. मुख्यमंत्री नीतीशकुमार स्वत: कट्टर समाजवादी राहिलेले आहेत.
- बिहारची आजची स्थिती अशी नाही की, येथे एखाद्या सुराज्य अभियानाला यश मिळेल. बिहारमधील गुंतागुंतीची सामाजिक संरचना व समाजवादाची घट्ट पाळेमुळे यांना प्रशांत किशोर यांना सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत केजरीवाल होण्याचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते.
- ते पुढील भूमिका काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४ किंवा ५ मे रोजी ते पुढील रणनीती ठरविणार आहेत. सध्या ते चिंतन करीत आहेत.