नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसून येत आहे. तसेच, या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह काही राज्यांत मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, परंतु मुलांसाठी देशात अद्याप कोरोना लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर तज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
यादरम्यान, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, भारतात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिन्यांचा कालावधी लागेल आणि अशा परिस्थितीत दीर्घकाळ मुलांच्या भविष्याचे नुकसान करता येणार नाही. मुलांच्या विकासासाठी शाळा उघडणे आवश्यक आहे. कारण मुलांसाठी शारीरिक संपर्क महत्त्वाचा असतो.
कोरोनाची प्रकरणे कमी असलेल्या ठिकाणी शाळा उघडता येतात, असे शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. याचबरोबर, ते म्हणाले की, सर्व मुलांना ऑनलाइन अभ्यास करण्याची सुविधा नाही किंवा तशा परिस्थितीचे वातावरण नसते, त्यामुळे शाळा उघडणे आवश्यक आहे. जवळपास सर्व शाळांमधील शिक्षकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, त्यामुळे ही स्थिती सर्वात अनुकूल आहे.
याचबरोबर, सर्व शिक्षकांनी पुढे येऊन स्वत: कोरोनाची लस घ्यावी, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. तसेच, शाळा प्रशासनाला मुलांच्या लंच ब्रेक आणि इतर कोणत्याही वेळी गर्दी होऊ देऊ नये, असे आवाहन डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे. ते म्हणाले की, मुले सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आहेत की नाही, याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी दुसरीकडे, कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता मुलांचे वॉर्ड आणि इतर वैद्यकीय उपकरणे उभारण्याची व्यवस्था केली जात असल्याचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तयारी जोरात सुरू आहे.