जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची धामधूम सुरु आहे. सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचे प्रमुख मदन राठोड यांनी शनिवारी एक मोठे विधान केले आहे. जर खींवसर येथील आरएलपी खासदार हनुमान बेनिवाल यांच्या पत्नी कनिका बेनिवाल खींवसर पोटनिवडणुकीत पराभूत झाल्या, तर हनुमान बेलीवाल यांना त्याचा फायदा होईल, कारण कनिका बेनिवाल घरी राहून त्यांच्या मुलांची काळजी घेतील, असे मदन राठोड यांनी म्हटले आहे.
कनिका बेनीवाल या आरएलपीच्या उमेदवार असून १३ नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक लढवत आहेत. यावरून मदन राठोड यांनी निशाणा साधला. हनुमान बेनिवाल आणि त्यांची पत्नी दोघेही राजकारण करत राहिले तर त्यांच्या कुटुंबाचे काय होईल? असा सवाल मदन राठोड यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "मी सोशल मीडियावर पाहिलं की, ते (हनुमान बेनिवाल) काळजीत दिसत होते की, जर त्यांची पत्नी निवडणूक जिंकली नाही तर त्या आपल्या 'पीहार' (आईवडिलांच्या घरी) जातील. भाऊ, तुम्हाला इतकी भीती वाटत होती. मग तुम्ही (पोटनिवडणुकीत तुमच्या पत्नीला उतरवण्याचा) असा धोका का पत्करला?"
पुढे मदन राठोड म्हणाले, "तुम्हाला माहीत आहे की, त्या जिंकू शकत नाहीत. पण माझा एक सल्ला आहे. हनुमान जी, तुमची पत्नी हरली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी जातील किंवा कुठेही. पण, त्या मुलांचा सांभाळ करतील. मुलांची काळजी घेणे महत्वाचे नाही का? जर तुम्ही दोघे राजकारण करत राहिल्यास कुटुंबाचे काय होईल? हे समजून घेणे आवश्यक आहे."
काँग्रेसवरही हल्लाबोल मदन राठोड यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत काँग्रेसचे अनेक नेते जामिनावर असून राजकारण करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "काँग्रेस नेते जामिनावर आहेत. त्यांनी मोठे घोटाळे केले आणि त्यांना अटक करण्यात आली. ते जामिनावर आहेत आणि राजकारण करत आहेत." यावेळी मदन राठोड यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, पी चिदंबरम आणि इतर नेत्यांची नावे घेऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला.