नवी दिल्ली : सध्या हॉस्पिटलमध्ये अनेक तरुण रुग्ण येत आहेत. त्यांना मोबाइल फोनची रिंग टोन वारंवार ऐकू येते, अशी त्यांची तक्रार आहे. त्यामुळे ते त्यांचा फोन पुन:पुन्हा तपासतात; मात्र प्रत्यक्षात तो सायलेंट असतो. त्यावर ना कोणता कॉल असतो, ना मेसेज. डॉक्टरांच्या मते, हा फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम आजार असून, तो मोबाइलच्या अतिवापरामुळे होत आहे.
फँटम व्हायब्रेशन सिंड्रोममुळे चिंताग्रस्ततेचे विकार वाढत आहेत. याला ‘टॅक्टाइल हॅलुसिनेशन’ म्हणतात; म्हणजे प्रत्यक्षात नसलेली गोष्ट जाणवणे. याला ‘लॉर्ड बॉडीली हॅबिट्स’ असेही म्हणतात.
प्रकरण-१ पर्समधून फोनचा आवाज
साक्षी वाजपेयी या ३२ वर्षीय ऑफिसला जाणाऱ्या महिलेले सांगितले की, ती काम करताना सतत फोनचा विचार करत असते. कार्यक्रम सुरू असतानाही मला वारंवार पर्समध्ये फोन वाजत असल्याचे जाणवत होते. झोपेतही फोन वाजतोय असे वाटते. यामुळे भावनिक गडबड होत आहे.
प्रकरण-२ नोटिफिकेशनची सवय
१९ वर्षीय निकिता यादव म्हणाली की, कोरोनाच्या काळात तिला वेब सिरीज पाहण्याची आणि मोबाईलवर व्हिडीओ कॉल करण्याची सवय लागली. आता नोटिफिकेशनचा आवाज येत असल्याचे लक्षात येते; पण मोबाईल पाहिला असता काहीच मेसेज आलेला नसतो.
हा आजार काय आहे?
गॅझेट् सच्या अतिवापरामुळे फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम होतो. फँटम लिंब सिंड्रोममध्ये, हात आणि पाय कापून घेतलेल्या व्यक्तीला अंग नसतानाही त्याला खाज येत आहे असे वाटते.
- डॉ. आशिषकुमार रस्तोगी
मोबाइल कमी वापरा
फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम टाळायचा असेल तर मोबाइलचा वापर कमी करा. तुमच्या जीवनात खेळ, सामाजिक संवाद आणि योग, व्यायाम, इत्यादींचा समावेश करा.
- डॉ. सत्यकांत त्रिवेदी, मानसोपचार तज्ज्ञ