India Canada Rift: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढतच चालला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडाचा खरपूस समाचार घेतला.
"कॅनडाच्या भूमीवरील दहशतवादी कारवायांबाबत आम्ही त्यांच्याशी अत्यंत विशिष्ट माहिती शेअर केली आहे. पण कॅनडाने भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर केलेली नाही. कॅनडा हे दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विचार करण्याची गरज आहे", असे बागची यांनी सुनावले.
बागची पुढे म्हणाले, "कॅनडाची व्हिसा सेवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. कॅनडा सरकारचे सर्व आरोप राजकीय हेतुने प्रेरित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर न करण्याने त्यावर शिक्कामोर्तब होत आहे. आम्ही या प्रकरणावरील विशिष्ट माहितीबद्दल जागरूक राहू इच्छितो. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कॅनडा आणि पाकिस्तानकडून आर्थिक मदत आणि पाठबळ असलेला दहशतवाद. यावर तडजोड होणे शक्य नाही."
भारतीय दूतावास काम करू शकत नाही!
कॅनडातील व्हिसा सेवा बंद करण्याच्या निर्णयावरही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्टीकरणे दिले. "सर्वांना कॅनडामधील आमच्या उच्चायुक्तालये आणि वाणिज्य दूतावासांना भेडसावणाऱ्या धोक्यांची आणि सुरक्षा धोक्यांची जाणीव आहे. यामुळे त्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आमचे उच्चायुक्त आणि वाणिज्य दूतावास तात्पुरते बंद आहेत, कारण प्रभावीपणे कार्य करण्यास ते अक्षम आहेत. आम्ही नियमितपणे याचे पुनरावलोकन करू."