हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भारताने कॅनडाच्या विरोधात आपली भूमिका कठोर केल्याने कॅनडाने भारतात तैनात असलेल्या आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलविण्यास सुरुवात केली आहे. तथापि, निज्जर हत्येप्रकरणी पडती भूमिका घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिला.
भारताने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले की, कॅनडाने आपल्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलवावे. कॅनडा अधिकाऱ्यांना क्वालालंपूर, सिंगापूरला हलवीत असल्याचे मानले जाते. दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी २१ सप्टेंबरला संसदेत भारतावर आरोप केले. केंद्राने सर्व आरोप नाकारून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अधिकाऱ्यांना परत बोलविण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला होता.
आधी आरोप मागे घ्या!
तोडगा काढण्यासाठी कॅनडाच्या पंतप्रधानांनी सार्वजनिक आणि खासगीरीत्या प्रयत्न केले आहेत. परंतु, जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत केलेले आरोप मागे घेतल्याशिवाय आणि कॅनडाच्या भूमीवर कार्यरत असलेल्या खलिस्तानींवर कारवाई केल्याशिवाय पंतप्रधान मोदी शांत होण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे.
भारताने आधीच कॅनडातील आपली व्हिसा सेवा बंद केली आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांना परत बोलविण्यास सांगितल्याने येथील भारतीयांना व्हिसा देण्यावरही परिणाम होऊ शकतो. भारताचे कॅनडात २१ राजनैतिक अधिकारी तर कॅनडाचे ६२ राजनैतिक अधिकारी भारतात काम करीत होते.
कॅनडाने भारतातील काही राजनैतिक कर्मचाऱ्यांना मलेशिया, सिंगापूरला हलविले
टोरँटो : कॅनडाने भारतातील बहुसंख्य राजनैतिक कर्मचाऱ्यांना मलेशियातील कौलालंपूर येथे, तसेच सिंगापूरच्या दूतावासांमध्ये हलविले आहे. दोन्ही देशांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या समान असायला हवी असे भारताने कॅनडाला बजावले होते.
कॅनडाने भारतातील त्यांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी असे केंद्र सरकारने सांगितले होते. त्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
देशांमध्ये तणाव कायम
कॅनडाने भारतातील राजनैतिक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या देशात हलविल्याचे वृत्त खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे. खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाली. त्यामागे भारत सरकारच्या एजंटांचा हात आहे असा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेला आरोप भारताने फेटाळून लावला होता. या मुद्यावरून दोन्ही देशांतील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत.
अवैधर बंदुकांप्रकरणी ८ शीख युवकांना अटक
कॅनडातील ओंटारियो प्रांतात ब्रॅम्प्टन शहरामध्ये बंदी घातलेली अग्निशस्त्रे बाळगल्याच्या आरोपावरून १९ ते २६ वर्षे वयोगटातील आठ शीख युवकांना पोलिसांनी अटक केली. २ ऑक्टोबरला ब्रॅम्प्टन शहरात गोळीबार करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून या शीख युवकांना अटक करून त्यांच्याकडील बंदुका जप्त केल्या.