ऑनलाइन टीम
चेन्नई, दि. १३ - बँकभरतीदरम्यान उमेदवारांची खासगी वैद्यकीय माहिती मागवल्यामुळे कॅनरा बँक वादात सापडली असून आता हा अर्ज मागे घेण्यात आला आहे. बँकेने दिलेल्या जाहिरातीत महिला उमेदवारांना त्यांच्या मासिक पाळीचा इतिहास, त्यांच्या छातीचे माप व गर्भधारणेचा पुरावा आदी गोष्टींबद्दलची माहिती नमूद करण्यास सांगण्यात आले होते.
उमेदवार निवड प्रक्रियेतील लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर तिस-या टप्प्यात उमेदवारांना ही माहिती नमूद करण्याची सूचना देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर एखादी महिला गर्भवती आढळल्यास तिची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकारही वैद्यकीय अधिका-याला देण्यात आले होते. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीला किडनी, हृदयविकार, मधुमेह , कर्करोग किंवा एड्स यापैकी आजार आढळल्यास त्यालाही पदासाठी अयोग्य ठरवून कामावरून काढण्यात येऊ शकते, असेही या मेडिकल फॉर्ममध्ये नमूद करण्यात आले होते.
मात्र हा फॉर्म उमेदवारांमध्ये भेदभाव करणारा असल्याचे सांगत बँक कर्मचा-यांच्या संघटनेने या निर्णयाविरोधात निदर्शने केली. अखेर बँकेने हा पाच पानी फॉर्म मागे घेतला आहे.