कोलकाता : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे तिन्ही निर्णय रद्द करा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शनिवारी केली. मोदी कोलकाताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज आले. ते येण्याच्या आधीपासून सीएए, एनआरसीच्या विरोधात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व डाव्या पक्षांनी स्वतंत्रपणे कोलकाता व पश्चिम बंगालच्या अन्य भागांत निदर्शने केली.
सीएए, एनआरसी, एनपीआर याविषयी दिल्लीला येऊन चर्चा करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना सांगितले. ममता यांनी नरेंद्र मोदी यांची राजभवनमध्ये सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर, त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालला केंद्र सरकारकडून ३८ हजार कोटी रुपये येणे आहे. बुलबुल चक्रीवादळाच्या वेळेस केंद्राने ७ हजार कोटी रुपयांची जी आर्थिक मदत जाहीर केली, तिचाही यात समावेश आहे. केंद्राने हा निधी लवकरात लवकर द्यावा, अशी मागणीही आपण पंतप्रधानांकडे केली.
सीएए, एनआरसी, एनपीआर या विरोधात देशभर आंदोलने सुरू असल्याचेही त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.या भेटीनंतर त्या तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेने राजभवनाजवळच सीएएविरोधात आयोजिलेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या. मोदी यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, डाव्यांनी कोलकाता विमानतळाजवळ व राज्याच्या अन्य भागांमध्ये जोरदार निदर्शने केली. त्यामुळे कोलकात्यात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी होणाºया समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्यात आले आहेत.बेलूर मठात वास्तव्यविमानतळावर नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला ममता बॅनर्जी गेल्या नाहीत. राज्यपाल जगदीप धनकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी आज रात्री राजभवनात राहणार होते, पण कार्यक्रमात बदल करून ते रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठात राहिले. रविवारीही ते कोलकातातील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.