उज्जैन: भाजप नेते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जयभान सिंह पवैया यांनी वादग्रस्त वक्तव्यं केलं आहे. भारत माता की जय आणि वंदे मातरम न म्हणणाऱ्यांचे नागरिकत्व रद्द करा, असं वक्तव्य त्यांनी शनिवारी केलं. भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांना बोलत होते.
काही दिवसांपूर्वी उज्जैनमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले होते. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर जयभान सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे. या घटनेनंतर भारतात राहताना कोणालाही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याची परवानगी दिली जाऊ शकते का, याबाबत प्रश्न निर्माण झालाय. या घटनेनंतर राजकारणही तापलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरुन या संपूर्ण घटनेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
गृहमंत्र्यांकडून दिग्विजय सिंहांच्या ट्विटचे खंडनदिग्विजय सिंह यांच्या ट्विटचे गृहमंत्र्यांकडून खंडन करण्यात आलं होतं. तर, दिग्विजय सिंहांनी व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हटले. ते म्हणाले की, ज्या व्हिडीओमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्याचा दावा केला जात आहे, त्याला 'पाकिस्तान जिंदाबाद' नाही तर 'काझी साहब जिंदाबाद' म्हटले जात आहे. दिग्विजय यांनी केलेल्या या ट्विटनंतर राज्यातील राजकारण तापलं. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही दिग्विजय यांचा दावा फेटाळून लावत, व्हिडिओ खरा असल्याचं म्हटलं.