हैदराबाद : तीनवेळा तलाक असे म्हणून पत्नीला घटस्फोट देण्याच्या प्रथेमध्ये पर्सनल लॉची मान्यता रद्द होण्याची व समान नागरी कायदा लादला जाण्याची बीजे आहेत, असे म्हणून तीनवेळा तलाकला आंध्र प्रदेश व तेलंगण अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष आबीद रसूल खान यांनी विरोध केला आहे. तीनवेळा तलाकच्या मुद्यावर अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने आपली भूमिका बदलावी, असे आवाहन खान यांनी केले आहे. मुस्लीम समाजाला आज फार मोठ्या सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. देशभर लक्षावधी महिलांची त्यांच्या नवऱ्यांनी तीनवेळा तलाक म्हणून घटस्फोट दिल्याने फरपट होत आहे, असे खान म्हणाले. ते म्हणाले, ‘‘मी एआयएमपीएलबी व जमिएत-उलेमा ए हिंदला लिहिलेल्या पत्रात माझी मते स्पष्टपणे सांगितली. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत असंख्य मुस्लीम महिला भेटल्या व त्यांना होणारा छळ, नवऱ्याने सोडून देणे, पोटगी न मिळणे आणि तलाक वा खुला मंजूर न करण्याबाबत न्याय हवा होता.’’ (वृत्तसंस्था)
‘समान नागरी’ टाळण्यास ट्रिपल तलाक रद्द करा
By admin | Published: September 26, 2016 12:31 AM