नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सहाराप्रमुख सुब्रत रॉय आणि इतर दोघांना दिलेला पॅरोल शुक्रवारी रद्द केल्याने त्या दोघांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. मात्र त्यांना श्रद येण्यासाठी न्यायालयाने एका आठवड्याची मुदत दिली आहे.सेबीने सहाराच्या काही मालमत्तांची विक्री केली. या प्रक्रियेत आम्हाला सहभागी करण्यात आले नाही, असे सहाराचे वकील राजीव धवन यांनी सांगताच सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ नाराज झाले. तुमचे ऐकून घ्यावे, असे तुम्हाला वाटत असेल, तर आधी तुम्ही (अशिलाने) तुरुंगात जा. काय करायचे हे आम्हाला सांगू नका. जामिनासह अंतरिम दिलासा रद्द करण्यात येत आहे. सर्वांना ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात येत आहेत, असे न्यायालय म्हणाले. न्यायालयाच्या अंतिम निर्देशाप्रमाणे आम्ही ३५२ कोटी रुपये भरले असताना त्यांना पुन्हा तुरुंगात पाठविले पाहिजे, असे म्हणणे न्याय्य नाही, असे धवन म्हणाले. त्यावर सहाराने आम्हाला जी मालमत्तांची यादी दिली ती आधीच जप्त केलेल्या मालमत्तांची आहे, असेही सेबीच्या वकिलाने सांगितल्यानंतर न्यायालय सहाराच्या वकिलांना म्हणाले, तुम्ही आधीच जप्त केलेल्या मालमत्तांची यादी दिली. तुम्ही सहकार्य करीत नाहीत. तुम्ही (अशिलाने) तुरुंगात गेलेलेच बरे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सहाराप्रमुखांचा पॅरोल रद्द, परत तुरुंगवास
By admin | Published: September 24, 2016 5:56 AM