नवी दिल्ली-
देशात येत्या तीन वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ वेगानं होणार असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) केला आहे. २०२५ पर्यंत देशात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये १२.७ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. वाढती आकडेवारी पाहता तज्ज्ञांनी धोका व्यक्त केला आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मोडिकल रिसर्चच्या माहितीनुसार २०२० मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्णांचे आकडे १३.९२ लाख (जवळपास १४ लाख) इतके होते. २०२१ मध्ये यात वाढ होऊन १४.२६ लाख इतकी झाली. तर २०२२ मध्ये १४.६१ लाखांवर आकडा पोहोचला.
कारण काय?तज्ज्ञांच्या मतानुसार देशात हृदय विकार आणि श्वसनासंदर्भातील आजारांपेक्षा कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. कॅन्सरच्या प्रसारासाठी अनेक मुद्दे कारणीभूत आहेत. यात वाढतं वय, बदलती जीवनशैली, व्यायाम आणि पौष्टिक आहाराची कमतरता यांचा समावेश आहे.
अनेकदा लोकांना कॅन्सरच्या लक्षणांची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे वेळीच निदान होत नाही आणि उपचारातही उशीर होऊन जातो. लवकर उपचार न मिळाल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यासाठी लोकांमध्ये कॅन्सरच्या बाबतीत जागरुकता निर्माण करणं देखील महत्वाचं आहे.
देशात कॅन्सरच्या बाबतीत पुरुषांचं प्रमाण अधिकगेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहता भारतात पुरुषांमध्ये सर्वाधिक तोंडाचा आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण आढळून आलं आहे. तर महिन्यांमध्ये सर्वाधिक ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सरचे रुग्ण आढळून आले आहेत.
बंगळुरू स्थित आयसीएमआर नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चनुसार (एनसीडीआयआर) २०१५ ते २०२२ पर्यंत सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या आकड्यांमध्ये जवळपास २४.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. १४ वर्षाच्या लहान मुलांमध्ये लिम्फॉइड ल्युकेमिया म्हणजेच रक्ताशी निगडीत कॅन्सरचा धोका अधिक आहे. कॅन्सरमधून बचावासाठी जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे.