केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी अग्निवीर ही सैन्य दलातील भरती प्रक्रियेसाठी नवी योजना लागू केली. या योजनेला मोठा विरोधही झाला. मात्र, आता या योजनेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील हिषा बघेल हिची अग्नीवर म्हणून निवड झाली असून ती छत्तीसगड जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर बनली आहे. नेव्ही दलासाठी तिची निवड झाली आहे. ओडिशातील चिल्का येथे इंडियन नेव्हीकडून सीनियर सेकेंडरी रिक्रूटचे प्रशिक्षण हिषाला देण्यात येत आहे.
अग्निवीरच्या या बॅचचे ट्रेनिंग मार्च महिनाअखेरपर्यंत सुरू असणार आहे. त्यानंतर, त्यांना देशसेवेसाठी पाठवण्यात येत आहे. विशेष गोष्ट ही आहे की, हिषाने अग्निवीर बनण्यासाठी स्वत:हून मेहनत घेतली. त्यासाठी, शाळेपासूनच ती दररोज धावण्याचा सराव करत होती. त्यासोबतच, आवश्यक कसरती आणि योग प्राणायमही ती करत. छत्तीसगडचे गृहमंत्री यांच्या विधानसभा मतदारसंघातील बोरी गारका या लहानशा गावातून हिषाने ही भरारी घेतली आहे. शालेय शिक्षण संपल्यानंतर उतई महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिच्या स्वप्नांना बळकटी मिळाली. येथे एनसीसी कॅडेट बनून तिने सैन्य भरतीची तयारी सुरू केली होती. तसेच, गावातील मुलांसोबतही ती धावण्याची आणि भरतीची तयारी करत होती. सैन्य भरतीची तयारी करणारी तिच्या गावातील ती पहिली मुलगी होती.
सप्टेंबर महिन्यात नौदलामध्ये अग्निवीर भरतीसाठी अर्ज निघाले होते. त्यावेळी, हिषाने आपला अर्ज दाखल केला. हिषाच्या फिटनेसला पाहून शारिरीक चाचणीत तिची प्राधान्याने निवड झाली. हिषाने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर, गावातील नागरिकांनी तिचा सत्कार आणि सन्मानही केला. हिषापासून प्रेरणा घेत गावातील इतरही मुलींनी आता सैन्य भरतीची तयारी सुरू केली आहे.
हिषाचे वडिल संतोष हे गेल्या १२ वर्षांपासून कँन्सरच्या आजाराने ग्रासले आहेत. आपल्यावरील उपचारासाठी त्यांनी गावाकडील जमीन आणि चालवत असलेली रिक्षाही विकली. दरम्यान, हिषाने स्वत: लहान मुलांच्या ट्युशन घेत आपला शैक्षणिक खर्च भागवला. त्यामुळेच, हिषाच्या यशाचा तिला आणि तिच्या कुटुंबीयांनाही अत्यानंद झाला आहे.