चेन्नई : विमानतळावर सोनं, अंमली पदार्थांची तस्करी करणारे अनेक क्लुप्त्या लढवितात. मात्र, त्यांच्या या क्लुप्त्या फोल ठरविण्यास विमानतळावरील सीमा शुल्क विभागाची यंत्रणा नेहमीच तयार असल्याचे दिसून येते. चेन्नई येथील विमानतळावर अशाच प्रकारे हेरॉईनची तस्करी करणा-या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 100 ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून त्यांने हे हेरॉईन चक्क कंडोममध्ये लपविले होते. विमानतळावरील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकांनी कोलंबोला जाणा-या एका व्यक्तीला तपासणीसाठी थांबविले. यावेळी त्याच्या गुप्तांगाजवळील भाग जास्त फुगीर दिसत होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी तपासणी केली तेव्हा लक्षात आले की व्यक्तीने कंडोम घातला होता. त्या कंडोमध्ये 100 ग्रॅमचे हेरॉइन रबर बँडच्या आधारे बांधून ठेवले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेला हा आरोपी चेन्नईमधील एका कॉलेजमध्ये स्टोअरकीपरची नोकरी करतो, असे अधिका-यांनी सांगितले. तसेच, याप्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याला सीमा शुल्क विभागाकडे सोपविण्यात आल्याचेही अधिका-यांनी सांगितले.
चेन्नई विमानतळावर कंडोममध्ये हेरॉईन लपविणा-याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 10:15 PM