नवी दिल्ली - माजी पंतप्रधान व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं देखील सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेससोबत युती करण्यासासाठी आपण अद्यापही तयार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसबरोबर युती करण्याची चूक परत करणार नाही असं देवेगौडा यांनी सांगितलं आहे.
एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकमध्ये मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता देखील व्यक्त केली आहे. 'राज्यात मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसं झालं तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू. पुन्हा ती चूक करणार नाही. सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढू' असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे. याआधी एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वातील सरकार कोसळल्यानंतर देवेगौडा आणि सिद्धरमय्या यांनी एकमेकांवर आरोप केले होते.
काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये देशातील सर्व व्यवस्था जातीयवादी शक्तींनी ताब्यात घेतल्या आहेत. लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असून त्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन देवेगौडा यांनी केले होते. तसेच कर्नाटकातील जनता दलाचे सरकार सत्तारूढ होताना अशा शक्ती एकत्र येण्याची शक्यता होती, मात्र ते झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. जनता दल कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात देवेगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता त्यावेळी ते बोलत होते.
'भारतीय जनता पाटी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल हे नेते एकत्र येण्याची चिन्हे होती, मात्र दुर्दैवाने ते साध्य झाले नाही. त्यानंतर आता पुन्हा देशातील स्थिती बिघडली आहे. प्रत्येक यंत्रणेत सरकारी हस्तक्षेप होतो आहे. याचा सगळ्याचा प्रतिकार करण्याची गरज आहे असं एच. डी. देवेगौडा यांनी म्हटलं होतं.