कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गांगुली हे त्यांच्या एका वक्तव्याने वादात सापडले आहेत. आपण गांधी आणि गोडसे यांच्या पैकी एकाची निवड करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने गांगुली यांच्यावर टीका करत, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना दिलेली उमेदवारी मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
एका बंगाली वाहिनीसोबत बोलताना कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गांगुली म्हणाले, "मी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांपैकी एकाची निवड करू शकत नाही. गांधी हत्येसाठी गोडसेंचे तर्क समजून घ्यावे लागतील. विधी व्यवसायात असल्याने माझ्यासाठी घटनेची दुसरी बाजू समजून घेणे महत्त्वाचे आहे. मला त्यांचे (गोडसेंचे) लेखन वाचावे लागेल आणि त्यांना महात्मा गांधींना का मारावे लागले? हे समजून घ्यावे लागेल. तोपर्यंत मी गांधी आणि गोडसे यांपैकी एकाची निवड करू शकत नाही."
गांगुली यांच्या वक्तव्यावर काँग्रेस भडकली - गांगुली यांच्या या विधानावरून काँग्रेस पक्ष चांगलाच भडकला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, कोलकाता उच्च न्यायालयाच्या माजी न्यामूर्तींचे म्हणणे आहे की, ते गांधी आणि गोडसे यांच्या पैकी कुण्या एकाची निवड करू शकत नाहीत, हे अत्यंत वाईट आहे. हे स्वीकारले जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीची उमेदवारी तात्काळ मागे घ्यायला हवी.
महत्वाचे म्हणजे, गांगुली यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा निषेधही केला होता. माजी न्यायमूर्ती गांगुली हे नुकतेच भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या रविवारी भाजपने जाही केलेल्या पाचव्या यादीत त्यांच्या नावाचाही समावेश आहे.