नवी दिल्लीः देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय आकाशातही उंचच उंच भराऱ्या मारणाऱ्या भारताच्या जेट एअरवेज कंपनीला 'इमर्जन्सी लँडिंग' करावं लागण्याची शक्यता आहे. कारण, कंपनीची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली असून खर्चामध्ये लक्षणीय कपात न केल्यास पुढच्या ६० दिवसांत त्यांच्या तिजोरीत खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारावरही गदा आल्यानं कंपनीत अस्थिरता, अस्वस्थता पसरलीय. जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांच्यासह व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांना हा 'जोर का झटका' दिला आहे.
'दोन महिन्यांनंतर कंपनी चालवणं शक्य नसल्याचं व्यवस्थापनानं आम्हाला सांगितलंय. खर्चाला कात्री लावण्यासाठी काही ठोस पावलं उचलली जातीलच, पण वेतन कपातीची घोषणा करून ते मोकळे झालेत. आता ही परिस्थिती काही काल-परवा उद्भवलेली नक्कीच नाही. पण, आत्तापर्यंत कंपनीने आम्हाला याबाबत जराही कल्पना दिली नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावरील विश्वास डळमळीत झालाय', अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. आपल्याला अंधारात ठेवलं गेल्याबद्दल, बऱ्याच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला ई-मेलवरून जाब विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना उत्तरच मिळालं नाही.
नोकऱ्यांवरही कुऱ्हाड
खर्च कमी करण्याच्या सूचना आल्यानंतर जेटमध्ये वेतन कपातीसोबतच कर्मचारी कपातही सुरू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. अभियांत्रिकी विभागातील काही कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्याचे निरोप पाठवण्यात आलाय. तसंच, कर्मचाऱ्यांचा पगार २५ टक्के कमी केल्यास दरवर्षी ५०० कोटी रुपये वाचणार असल्याचं सांगत कंपनीनं नोकरदारांच्या खिशातही हात घातला आहे. नरेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली जेटच्या व्यवस्थापकांची टीम मुंबई कार्यालयात आली होती. दोन वर्षांसाठी वेतन कपात केली जाईल आणि त्याची कुठलीही परतफेड केली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय.
कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ आणि इंडिगोची मुसंडी, या कारणांमुळे कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागत असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. गेल्या सहा वर्षांत कंपनीचा विस्तारच होऊ शकला नाही आणि तिजोरी रिकामीच होत राहिली, असं त्यांनी नमूद केलं. २०१६ आणि २०१७ या आर्थिक वर्षांमध्ये नफा कमावणाऱ्या जेटला २०१८ मध्ये ७६७ कोटींचा तोटा झाला होता. त्याचा फटका आता कर्मचाऱ्यांना बसणार आहे.