नवी दिल्ली - कोरोनाने दिल्लीत हाहाकार घालायला सुरुवात केली आहे. राजधानीत गेल्या 24 तासांत मृतांचा विक्रमी आकडा समोर आला आहे. गेल्या रात्री जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, काल एका दिवसात येथे सर्वाधिक 131 जणांचा कोरोनामुले मृत्यू झाला. तर 24 तासांत तब्बल 7486 नवे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी दिल्लीतील केजरीवाल सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्मयानुसार, दिल्लीत मास्कचा वापर न केल्यास आता 2 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ही घोषणा खुद्द अरविंद केजरीवालांनी केली आहे.
मास्क न वापरणाऱ्यांना यापूर्वी 500 रुपये दंड आकारला जात होता. मात्र, तरीही अनेक लोक मास्कचा वापर करत नव्हते. यामुळे आम्ही दंडाची रक्कम आता 2 हजार रुपये एवढी केली असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. देशाचा विचार करता, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 89 लाख 60 हजारच्या जवळपास पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात जवळपास 45 हजार नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर एवढ्या वेळातच जवळपास 49 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित -मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील सर्व खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत. तसेच, सर्व प्रकारच्या नॉन-क्रिटिकल प्लॅन्ड सर्जरी टाळण्यात याव्यात, असे सांगण्यात आले आहे. दिल्ली सरकार 663 आयसीयू बेडची व्यवस्था करत आहे. तर केंद्र सरकार 750 आयसीयू बेडची व्यवस्था करत आहे. यानुसार एकूण आयसीयू बेडची संख्या 1400हून अधिक होईल.
छठ पूजेसंदर्भात केजरीवालांचं आवाहन -नागरिकांनी धूम धडाक्यात छठ पूजा साजरी करावी, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गरदी करू नये. अनेक राज्य सरकारांनी यावर बंदी घातली आहे. कोरोनाचा अधिक प्रसार होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. यामुळे मी सर्वांना विनंती करतो, की छठपूजा घरीच साजरी करा.