ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 23 - काश्मीर खोऱ्यात लष्कराच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्यांन अद्दल घडवण्यासाठी एका काश्मिरी तरुणाला जीपला बांधणाऱ्या मेजर गोगोई यांच्या कृतीबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच काल लष्कराने गोगोईंना सन्मानित केल्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असतानाच काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मात्र मेजर नितीन गोगोईंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. माजी सैनिक असलेल्या अमरिंदर सिंग यांनी गोगोईं यांनी त्या परिस्थितीत केलेली कृती योग्य असल्याचे म्हटले आहे.
मेजर गोगोई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आज अमरिंदर सिंग पुन्हा एकदा मेजर गोगोई यांच्या समर्थनार्थ पुढे आले. "मेजर गोगोई यांच्या जागी लष्कराचा अन्य कुणी जवान असता तरी त्याने हेच केले असते. अगदी मी असतो तरी अशीच कारवाई केली असती," असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.
जवानांवर होणाऱ्या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी एका काश्मिरी तरुणाला जीपसमोर बांधून फिरवणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आले होते. लष्कराने गोगोई यांच्यावर होत असलेल्या टीकेला झिडकारून लावत त्यांचा सन्मान केला आहे. एक सर्वसामान्य जवान ते आर्मी सर्व्हिस कॉपमध्ये मेजरच्या हुद्यापर्यंत पोहोचलेल्या गोगोई यांच्या एका युवकाला जीपला बांधून मानवी ढाल बनवण्याच्या कृतीवर फार टीका झाली होती. गोगोई यांच्यावर मानवाधिकार आणि जिनेव्हा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता.
मात्र या कृतीवर टीका झाल्यावर या प्रकरणात पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 342 (चुकीच्या पद्धतीने एखाद्याला कारावासात ठेवणे), 149 (गुन्ह्यासाठी बेकायदेशीरपणे एकत्र येणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 367 (अपहरण करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने त्या लष्करी अधिका-याच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.
Happy to hear of possible bravery award for "human shield" officer Major Nitin Gogoi, hope it"s true, the officer deserves it @adgpi.— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) May 22, 2017